भुसावळ तालुक्यातील शेतकर्‍यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण –

जळगाव : शेतजमीन भोगवटा वर्ग झाल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भुसावळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोमवारपासून आमरण उपोषण छेडले आहे.
मांडवेदिगर, भिलमळी, गारखेडा येथील गोर बंजारा जातीचे दर्‍या खोर्‍यात व डोंगराळ भागात आदिवासी तसेच हिंदू गोर बंजारा समाजाचे लोकांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्याकडील शेतजमिनी या वडिलोपार्जित खरेदी खताद्वारे शासनाच्या रीतसर नजराणा भरून खरेदी खताद्वारे ताब्यात घेतलेल्या आहेत. 2015 पासून शासकीय अधिकारी यांच्या आडमुठ्या धोरणामुळे भोगवटा वर्ग (1) च्या जमिनी अचानक भोगवटा वर्ग (2) करण्यात आली परीणामी शासकीय अनुदान (सबसिडी) व खरेदी विक्री बंद झाली.

आज रोजी या जमिनीवर 10 ते 12हजार जनतेचा पोटपाण्याचा उदरनिर्वाह सुरू आहे मात्र ज्या दिवसांपासून खरेदी-विक्री बंद झाली त्या दिवसांपासून वरील लोकसंख्या असलेल्या जनतेचा आजारपणापासून ते लग्न कार्यापर्यंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतजमीन भोगवटा वर्ग (2) ची भोगवटा वर्ग (1) करून रीतसर 7/12 उतार्‍यावर नोंद करून द्यावी, अशी मागणी उपोषणार्थींनी केली आहे.
ही शेतजमीन भोगवटा वर्ग- 2 ची भोगवटा वर्ग – 1 मध्ये परिवर्तीत करून 7/12 उतार्‍यावर तशी नोंद करण्यात यावी अन्यथा मांडवेदिगर व भिलमाळी येथील शेतकरी व गावकरी मतदानावर बहिष्कार टाकतील, असा इशारा देखील उपोषणकर्ते प्रेमराज पवार, गुलाब पवार, संतोष पवार, शिवाजी पवार, रमेश पवार, विक्रमसिंग पवार, आमरसिंग पवार, ताराचंद पवार, जगदिश पवार आदींनी दिला आहे.