संस्कार भारती’तर्फे प्रबोधिनी एकादशीनिमित्त अभंगवाणी :

जळगाव : ‌‘संस्कार भारती’च्या संगीत विभागातर्फे प्रबोधिनी एकादशीनिमित्त अभंगवाणीचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात झाला. शहरातील निमखेडी रोडवरील ‌‘राजा पंढरीचा’ विठ्ठल मंदिरात हा उपक्रम पार पडला.

यावेळी साबुदाणा खिचडी, लाडू व केळी प्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या दरम्यान साधकांनी विविध संतांच्या रचना व भक्तिगीते गाऊन कार्यक्रमात रंगत आणली.

त्यात दुष्यंत जोशी यांनी ‌‘तीर्थ विठ्ठल’ हे भक्तीगीत गायले, तर नीळकंठ कासार यांनी ‌‘माझे माहेर पंढरी’, दिव्या चौधरी यांनी ‌‘अबिर गुलाल’, भगवंत फडणीस यांनी ‌‘एक तारी संगे’, सुनील रत्नपारखी यांनी ‌‘आता कोठे धावे’, भागवत पाटील यांनी ‌‘विठ्ठल आवडी’, प्रमोद नाटेकर यांनी ‌‘अमृताहूनी गोड’, राजेंद्र माने यांनी ‌‘पुण्यपर उपकार’, अथर्व मुंडले यांनी ‌‘हरी म्हणा कुणी’ सविता परमार्थी यांनी ‌‘आली कुठूनशी’, दिलीप चौधरी यांनी ‌‘माझा भाव तुझे’ ही भक्तीगीते गायली.

यासोबतच संध्या कौल, राजश्री धर्माधिकारी, मनीषा वाकळकर यांनी ‌‘रखुमाई रखुमाई, आज माझ्या विठ्ठलाचे रूप’ इत्यादी रचना सादर केल्या.
राजेंद्र माने यांनी संवादिनी तर दिव्या चौधरी व नीळकंठ कासार यांनी तबलासाथ केली.

अभंगास अनुरूप निरूपण सुचेता नेवे यांनी केले. मंदिराचे विश्वस्त अर्जुन पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी मोहन रावतोळे, प्रमोद जोशी, भरत लढे व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.