भुसावळ : दिवसेंदिवस तापमान वाढू लागले असल्याने आजारी पडणार्यांची संख्या ही वाढू लागली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शाळांच्या वेळेत एक एप्रिलपासून बदल केला आहे. सकाळी 7 ते 1 पर्यत शाळा भरल्या जात आहे. शाळांना व पालकांना जिल्हा प्रशासनाकडून उष्माघाताच्या पार्श्वभुमीवर सूचना करण्यात आल्या आहे.

जिल्हाधिकार्यांचे आदेश
एप्रिल महिना लागला असून तापमान सुध्दा दिवसेंदिवस वाढू लागले आहे. रात्री थंडी वाजते तर दिवसा कडक ऊन पडू लागले आहे. यामुळे मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या उन्हाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शाळांच्या वेळेत एक एप्रिलपासून बदल केला आहे. सकाळी 7 ते 1 वाजेपर्यत राहणार आहे. यामुळे मुलांना उन्हाचा फटका बसणार नाही. याची काळजी घेतली जात आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी मित्तल यांनी शिक्षण विभागाला पत्र देत शाळेची वेळ बदल आणि विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे सूचीत केले आहे. जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आदेशात उष्माघाताची लक्षणे, उपाय योजना याचीही सविस्तर माहिती दिली आहे.
उष्माघाताची लक्षणे
चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे, शरीराचे तापमान खूप वाढणे, पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, यावर उपाय असे- तहान लागलेली नसली तरी जास्तच जास्त पाणी पिण्यात यावे हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा, प्रवास करतांना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्यांनी डोक्यावर टोपी किवा पांढरा रुमाल बांधावा किवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ. आर. एस. घ्यावे, घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी आदीचा वापर करावा.
अशी घ्या काळजी
अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, गुरांना पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे तसेच ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे, कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.आदी सूचना केल्या आहे. नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन केले आहे.
वरीष्ठांच्या आदेशाचे पालन सुरू
जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार शाळांची वेळ शनिवारपासून बदल करण्यात आली आहे. उष्माघाताच्या पार्श्वभुमीवर शहरासह तालुक्यातील सर्वच शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे म्हणाले.


