वरणगाव – वरणगांवातील स्वस्त धान्य दुकानदार मनमानी करीत असून लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास अनेक अडचणीस सामोरे जावे लागत आहे तसेच धान्याक़रीता रांगेत तासनतास उभे रहावे लागते , वरीष्ठांनी दखल घ्यावी अर्शी मागणी जनसामान्यानी केली आहे
राज्य व केंद्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांना सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानावरून अल्पशः दरात दरमहा धान्य वितरीत केले जाते . मात्र, दुकानदार आपआपल्या मनमानी पद्धतीने दुकाने सुरु ठेवत असल्याने लाभार्थ्यांची धान्य खरेदीसाठी झुंबड उडते . तसेच लाभार्थ्यांना तासनतास रांगेत उभे रहावे लागत असुन लाभार्थ्यांमध्ये क्रंमाकावरून वाद निर्माण होतात . मात्र, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने वरीष्ठांनी दखल घेऊन दुकानदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे .
शासनाच्या माध्यमातुन गोर – गरीब लाभार्थ्यांना सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानावरून अल्पशा दरात धान्य वितरीत केले जाते . यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यासाठी नियम व अटी लागु केल्या आहेत . मात्र, दुकानदार शासनाचे नियम धाब्यावर ठेवुन मनमानी पद्धतीने दुकाने सुरु ठेवुन धान्य वितरीत करीत असल्याचा प्रकार समोर येत आहे . यामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे .
शहरात आठ दुकाने मात्र, गौड बंगाल
शहरात एस . डी . वंजारी, वसंतराव नाईक फुलसींग सोसायटी, बी .डी . राणे, ए. वाय. प्रधान, पी . जी . चौधरी, शेतकी संघ, नन्नवरे, आर . एन . चव्हाण असे आठ परवानाधारक दुकानदार आहेत . मात्र, यापैकी तिन दुकाने एस .डी . वंजारी व ए.वाय . प्रधान हे वसंतराव नाईक सोसायटी, बी.डी . राणे, आर . एन . चव्हाण यांची दुकाने भाडेतत्वावर चालवीत असल्याचे समोर येत आहे . यामुळे हे दुकानदार ठरावीक दिवशीच दुकाने सुरु ठेवत असल्याने लाभार्थ्यांना धान्य वेळेवर मिळावे यासाठी दुकानावर गर्दी करावी लागते . हा सर्व प्रकार गौडबंगाल असल्याने गरजु लाभार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक होत आहे .
प्रभागानुसार धान्य वितरीत व्हावे
शासनाच्या वतीने प्रत्येक प्रभागातील लाभार्थ्यांना त्यांच्याच प्रभागात धान्य वितरीत करण्याची गरज आहे . मात्र, शहरात विविध प्रभागातील लाभार्थ्यांना लांबच्या अंतरावरून स्वस्त धान्य दुकानदारांकडे यावे – जावे लागते . यासाठी किमान दोन प्रभागातील लाभार्थ्यांसाठी त्याच प्रभागात दुकाने सुरु करावी अशी मागणी होत आहे .
लाभार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या दुकानदारांवर व्हावी कारवाई
शहरातील बहुतांश दुकानदार आपल्या सोयीसाठी लाभार्थ्यांना वेठीस धरीत आहेत . यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया बंद आहे . धान्य कमी आले आहे . महिन्यातुन केवळ पाच ते सहा दिवस दुकाने सुरु ठेवणे अशा विविध प्रकारे लाभार्थ्यांना वेठीस धरीत आहेत . यामुळेही गरजु लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे .
रेशनचा माल काळ्या बाजारात
सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार शासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने दुकाने सुरु ठेवुन शिल्लक धान्याची काळ्या बाजारात विक्री करीत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे . मात्र, त्यांच्यावर थातुर – मातुर केली जाते . तसेच काही लाभार्थी अल्पश : दरात मिळणारे धान्य जादा दराने बाजारात विक्री करीत असल्याचे नुकतेच समोर आले असून मुक्ताईनगर येथील मालवाहू अॅपेरिक्षा क्र. एम . एच .१२/ सी टी . -९४०० बोदवड रस्त्यावरील श्री नागेश्वर महादेव मंदिराजवळ पकडण्यात आली . यामध्ये आठ हजार रुपये किंमतीचा शासकीय गहू व तांदूळ आढळुन आल्याने शे . जावेद शे . ईस्माईल रा . मुक्ताईनगर याचे विरोधात वरणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रीक्षासह ५१ हजार २५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे . यामुळे
वरीष्ठांनी याची दखल घेऊन काळ्या बाजारात धान्य विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे .



