भुसावळ -महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहरातील श्री सेवकांनी रविवारी शासकीय कार्यालयासह प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबवले. या उपक्रमात शहरातील १३ सरकारी कार्यालयांसह प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करुन तब्बल १२.५५ टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता दूत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भुसावळ विभागात वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी शहरात २९७ सेवकांनी स्वच्छता अभियान राबवले. प्रमुख रस्त्यांसह १३ शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता केली. सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यानच्या १२.२५ टन कचरा संकलित करुन डंपिंग ग्राउंड-पर्यंत विल्हेवाट लावण्यात आली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड व संवर्धन, पाणपोई, जलपुनर्भरण, आरोग्य तपासणी शिबिर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, जलाशयांमधील गाळ काढणे, बस थांबे निर्मिती असे उपक्रमही राबवण्यात येतात. भुसावळ श्री सेवकांनी व चोपडा येथेही अभियान राबवले. भुसावळात २९७ तर चोपडा येथील ९९ अशा एकूण ५२६ श्री सदस्यांनी त्यात सहभाग घेतला. या उपक्रमात भुसावळातील १३ व चोपडा येथील ६ असे एकूण १९ सरकारी कार्यालय व २१ किमी रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली.

यावल शहरातही स्वच्छता अभियान राबविले
यावल । शहरात रविवारी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वत्र स्वच्छता अभियान राबवण्यात आले. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रतिष्ठानच्या १२६ श्री सेवकांनी हा उपक्रम राबवला. यात सर्व प्रशासकीय कार्यालयांचा परिसर आणि सार्वजनिक रस्ते स्वच्छ करण्यात आले. रविवारी सकाळपासून प्रतिष्ठानच्या श्री सेवकांनी स्वच्छता अभियान हाती घेतले. त्या अंतर्गत शहरातील पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग , ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका कार्यालय परिसर, पंचायत समिती कार्यालयाचे आवार, बसस्थानक आणि शहरातील मुख्य रस्त्यावर श्री सेवकांनी सकाळी एकत्र येत स्वच्छता अभियान राबवले. सर्व परिसर स्वच्छ करून ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणावर कचरा संकलन करून शहराच्या बाहेर असलेल्या नगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये टाकण्यात आला.


