दिशादर्शक शिवराय चिकित्सकपणे जाणून आत्मसात करण्याची गरज – शिवव्याख्याते हभप गणेश महाराज फरताळे : शिवदर्शन सप्ताहात गुंफले सातवे पुष्प

भुसावळ – शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शिवरायांना छत्रपती ही पदवी तुकोबांनी दिली. वारकरी-धारकरी एकत्र आल्याने भक्ती-शक्तीने क्रांती केली. काही वेळा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली. अंधश्रद्धा निर्मूलन, जाती-पाती, रूढी-परंपरांच्या पलीकडे काम करून स्वराज्य निर्मिती करणाऱ्या दिशादर्शक शिवरायांना आज चिकित्सकपणे जाणून आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते हभप गणेश महाराज फरताळे (वढू बुद्रुक, पुणे) यांनी केले.
भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवदर्शन सप्ताहात सातवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. शिवदर्शन सप्ताहाची संकल्पना डॉ. जगदीश पाटील यांची आहे. प्रारंभी गणेश महाराज यांचा परिचय श्यामकांत रूले यांनी करून दिला. ‘छत्रपती शिवराय व आजचा समाज’ या विषयावर बोलताना हभप गणेश महाराज फरताळे म्हणाले की, माता जिजाऊ जन्माला आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी मुलीचा जन्मोत्सव साजरा केला. आज आपण त्याचे अनुकरण करण्याची गरज आहे. शिवरायांनी जीवावर खेळून स्वराज्याची निर्मिती केली. पुण्यात नांगर फिरवून स्वराज्यातील पहिली अंधश्रद्धा दूर केली. पुण्यात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. माणसाच्या मनात अधिराज्य निर्माण करून त्यांना श्रद्धेशी जोडले. म्हणून आपण छत्रपती शिवरायांना फक्त प्रतीक म्हणून नव्हे तर आदर्श म्हणून आपल्या आयुष्यासमोर ठेवावे. बऱ्याच वेळा शिवरायांचे जातीय कार्य सांगितले जाते. परंतु ते जागतिक कीर्तीचे योद्धा आणि जातिभेदापलीकडे काम करणारे होते. हे शिवराय आपल्याला समजून घ्यावे लागतील. स्त्रीपुरूष समानता, निर्व्यसनीपणा, अंधश्रद्धा निर्मूलन या बाबी त्यांच्या उल्लेखनीय आहेत. ‘सोळावे वरीस धोक्याचे’ असे म्हणण्यापेक्षा ‘सोळावे वरीस ज्ञानाचे’ म्हणून आपण काम केले पाहिजे, असेही हभप गणेश महाराज फरताळे यांनी सांगितले. सूत्रसंचालन अनिता पाटील यांनी तर आभार बी. बी. जोगी यांनी मानले.

मंगळ असणाऱ्या अनाथ मुलीशी लग्न –

छत्रपती शिवराय कीर्तन व व्याख्यानातून सांगत असताना त्यांच्या विचारांचे आचरण करण्याचा उपदेश मी करत असतो. शिवरायांनी अमावस्येच्या रात्री लढाया केल्या. लिंबूमिरची तोडून पुण्यात नांगर फिरवला. आपल्या मातेला सती जाण्यापासून रोखले. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रत्यक्ष पाऊल उचलले. हाच शिवरायांचा विचार स्वतः कृतीत आणून मंगळ असणाऱ्या एका अनाथ मुलीशी मी लग्न केले. कोरोनाच्या तीन लाटा उलटूनही आम्ही दोघेही सुखरूप आहोत, असे सांगून गणेश महाराज यांनी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला.