भुसावळ : राज्याचे उपमुख्मंत्री अजिद पवारयांनी शिक्षकांनी शनिवार, रविवार जादा तास घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढावे, असे सांगितले असतानाच राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष सुभाष माने यांनी त्याचे समर्थन करताना शिक्षकांनी दीड वर्ष बसून पगार घेतला, असे विधान केल्याने त्याचा भुसावळातील शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी निषेध केला आहे.

कोरोनामुळे शाळा बंद
शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, मुळात शिक्षकांनी स्वतः शाळा बंद ठेवल्या नव्हत्या किंवा शासनाला तशी विनंतीही केली नव्हती याउलट कोरोना रुग्णसंख्या घटता आता शाळा सुरू कराव्यात, अशी शिक्षकांनी मागणी ही केली होती. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शासनानेच शाळेत प्रत्यक्ष अध्यापणास बंदी घातली होती. शासनाच्या आदेशाने ऑनलाईन शिक्षण अद्यापही सुरूच होते. हे वास्तव उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार विसरले कसे? शिवाय कोराना संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कुटुंबही वार्यावर सोडून शिक्षक कोरोनाग्रस्त भागातही सर्वेक्षणाचे, लस देण्याचे काम करीतच होते शिवाय आदिवासी वाडा-पाड्यावर जाऊन अनेक शिक्षकांनी मुलांना शिकविले, असे प्रा.दलाल कळवतात.
विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याची जवाबदारी शासन घेणार का?
शिक्षकांनी दीड वर्ष बसून पगार घेतला, असे वक्तव्य राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष सुभाष माने यांनी केले असून ते निषेधार्थ आहे. शिक्षक शनिवार, रविवार तसेच उन्हाळ्याच्या सुटीतही शिकवतील पण विद्यार्थ्यांचे काय? ते नियमित शाळेत येतात का? त्यांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी शासन घेईल का? शिवाय शिक्षण शास्त्र, बाल मानस शास्त्र काय सांगते? मुलांना अशी सक्ती करणे म्हणजे आनंददायी शिक्षण काय? शिक्षणाचा दर्जा किती दिवस, किती तास शिकविले यावर अवलंबून नसतो तर किती तळमळीने, विद्यार्थ्यांशी समरस होऊन या हृदयीचे त्या हृदयी असा प्रेमळ संवाद साधल्यावर अवलंबून असते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोणते शिक्षण अपेक्षित आहे? त्यापेक्षा दादांनी शिक्षकांना शिकवण्याचे काम करू द्यावे, इतर कोणत्याही कामना जुंपू नये, शाळेला वेतनेतर अनुदान द्यावे, आज शाळांकडे खडू, कागद घ्यायला, विजेचे बिल भरायला, व कोणत्याच अत्यावश्यक कमासाठीही एक रुपयाही नाहीीं शाळांची दुरवस्था झालेली आहे. अश्या मूलभूत बाबींकडे लक्ष दिले तर विद्यार्थ्यांचे भवितव्य तरी घडेल, असेही प्रा.दलाल यांनी पत्रकात म्हटले आहे.


