भुसावळ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामासाठी मुंबई विभागातील ठाणे-दिवा दरम्यान रेल्वे प्रशासनाने शनिवार, रविवारी ब्लॉक घेतल्याने अप-डाऊन मार्गावरील 10 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात अमरावती-मुंबई, सेवाग्राम एक्स्प्रेसचा समावेश आहे.

ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाइनचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. या कामासाठी प्रशासनाने येत्या शनिवारी व रविवारी ब्लॉक घेतला आहे. ब्लॉकच्या काळात अप-डाऊन मार्गावरील दहा गाड्या रद्द झाल्या आहेत तसेच जालना-मुंबई, मुंबई-मनमाड, मनमाड-मुंबई एक्स्प्रेस या दोन गाड्या सुद्धा दोन दिवस धावणार नाही. 12112 व 12111 अमरावती-मुंबई ही गाडी शुक्रवारी व शनिवारी रद्द आहे. गाडी क्रमांक 12112 अमरावती-मुंबई एक्स्प्रेस 4 व 5 फेब्रुवारी, नागपूर-मुंबई सेवा-ग्राम एक्स्प्रेस शुक्रवारी (दि.4) व शनिवारी (दि.5), मुंबई-नागपूर सेवा-ग्राम एक्स्प्रेस 5 व 6 फेब्रुवारी, नांदेड-मुंबई राज्य राणी एक्स्प्रेस 4 व 5 फेब्रुवारी, मुंबई-नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस 5 व 6 फेब्रुवारीला रद्द असेल. दहा गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल होणार असले तरी आरक्षित तिकिटांचे पूर्ण पैसै परत मिळणार आहेत.


