जळगाव – शाळाबाह्य विद्यार्थ्यांना वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्याचे कार्य गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे. निसर्गाच्या सानिध्यात विविधांगी अनुभव घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या औपचारिक शिक्षण प्रवाहात आगमन झाल्यानंतर त्यांना शाळेशी समरूप करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, अध्यापनात उपक्रमशीलता, आनंददायी अध्ययन अशा माध्यमांतून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, अशी अपेक्षा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्यातर्फे वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी दोनदिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रशिक्षणाचे उद्घाटन डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी केले. प्रास्ताविकात डायटच्या समता विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती जयश्री पाटील यांनी प्रशिक्षणाची पार्श्वभूमी, महत्त्व व आवश्यकता याविषयी माहिती दिली. दोनदिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणात श्रीमती जयश्री पाटील यांनी शाळाबाह्य विद्यार्थी संबंधी प्रक्रिया व कार्यवाही याविषयी माहिती दिली. सीमा पाटील व भटू पाटील यांनी पहिली ते तिसरीसाठी मराठी व गणित, मनोज चिंचोरे व सुरेंद्र बोरसे यांनी पहिली ते आठवीसाठी विद्यार्थी मित्र भाषा मराठी, अश्विनी कोळी व प्रदीप चौधरी यांनी पाचवी ते आठवीसाठी विद्यार्थी मित्र भाषा हिंदी, पंडित बाविस्कर व ज्ञानेश्वर पाटील यांनी पहिली ते आठवीसाठी विद्यार्थी मित्र गणित, योगेश भोसले व विठोबा वाघ यांनी पहिली ते आठवीसाठी विद्यार्थी मित्र इंग्रजी याबाबत मार्गदर्शन केले. समारोपात डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी मनोगत व्यक्त केले. बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी प्रशिक्षणात तंत्रसहाय्य व पीपीटी सादरीकरण केले. आभार समता विभाग प्रमुख तथा वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती जयश्री पाटील यांनी मानले.

अध्ययन निष्पत्ती आधारित उपक्रमांची गरज – श्रीमती जयश्री पाटील
आरटीई कायद्यानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशित करून घेण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार वयानुरूप मुलांना समकक्ष वर्गात प्रवेश दिला जावा. हे विद्यार्थी दाखल करताना आवश्यक अभिलेखांची खात्री केली जावी. वर्गात दाखल केल्यानंतर जीवनवृत्तांत, अध्ययन स्तर निश्चिती, समायोजन प्रक्रिया व प्रेरक वातावरणाची निर्मिती व्हावी. त्यांना शासकीय योजना व लोकसहभाग मिळवून देता यावा. अध्ययन-अध्यापन करताना सहाध्यायी विद्यार्थ्यांद्वारे क्षमता विकसन, शैक्षणिक साहित्याचा वापर, अभिरुचीनुसार अध्ययन अनुभव रचना, नियमित वर्गात सामावून घेणे, विद्यार्थी स्तरानुसार स्वतंत्र साधने व स्वाध्यायांची निर्मिती, अतिरिक्त तणावापासून मुक्ती, सातत्यपूर्ण अध्ययन-अध्यापन व अध्ययन निष्पत्ती आधारित उपक्रमांचा समावेश अध्ययन-अध्यापनात व्हावा. नियमित विद्यार्थ्यांसोबत त्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात यावे. संवाद, स्वीकृती, सुरक्षितता व शिक्षण याद्वारे त्यांना औपचारिक शिक्षण प्रवाहात सामील करून घ्यावे, असे देखील आवाहन डायटच्या समता विभाग प्रमुख तथा वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती जयश्री पाटील यांनी केले.
अपेक्षित मूलभूत क्षमता प्राप्त व्हाव्या – डॉ. अनिल झोपे
काही ना काही कारणामुळे ज्या मुलांचे प्राथमिक शिक्षण अपुरे राहिले आहे, अशा मुलांना शाळेत दाखल करून घेतल्यानंतर त्यांच्या अध्यापनासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यानंतर त्यांच्या पाठीशी बराच अनुभव आहे. या अनुभवाचा उपयोग औपचारिक शिक्षणात करून घेतल्यास त्यांचे शिक्षण सुलभ होण्यास मदत होणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना वयानुरूप दाखल केल्यानंतर त्या त्या वयोगटाच्या अपेक्षित मूलभूत क्षमता प्राप्तीसाठी शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे, असे देखील आवाहन डॉ. अनिल झोपे यांनी केले.


