सध्याचे केन्द्रातील सरकार इंग्रजांपेक्षाही जास्त जुलमी – नाना पटोले

भुसावळ (प्रतिनिधी )-

स्वातंत्र्य पूर्व काळात ज्या प्रमाणे इंग्रज सरकार शेतकर्‍यांवर जुलूम करत होते. त्याच इंग्रजां पेक्षाही सध्याचे केंद्रातील सरकार जुलमी असल्याचा घणाघात कॉंग्रेसचे प्रदेशध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, देश सध्या बिकट परिस्थिती असून यास केंद्र सरकार जबाबदार आहे. यावर प्रधानमंत्री बोलण्यास तयार नाही. शेतकर्‍यांवर या सरकारकडून अन्याय होत आहे. शेतकरी विरोधी कायदा या सरकारने पारित केला आहे. या तिनही कायद्याचे दहन करण्यासाठी आपण जिल्हा दौर्‍यावर आलो आहोत.
भुसावळ मतदार संघात कॉंग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. हीच परिस्थिती महाराष्ट्राच्या कान्याकोपर्‍यात आहे. देशाची लोकशाही व संविधान सांभाळणे ही कॉंग्रेसची भुमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट करत भाजपा सरकारने लागू केलेली नोटबंदी, चुकीच्या जिएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला गेली. याबाबत संभाव्य नुकसानाबाबत मुजोर केंद्र सरकारला त्यावेळी खा. राहुल गांधी यांनी सरकारला सुचना केली होती. मात्र सरकारने त्यांच्या सुचनेला गांभिर्याने न घेता त्यांच्यावर ट्रोल करुन टिंगल उडवली होती. मात्र सध्याची परिस्थिती सर्वांसमोर आहे.
पक्षातील स्थानिक गटबाजीबाबत पदाधिकर्‍यांना सज्जड दम देत आगामी काळात कोणीही ञ्मी नेता आहे असे समजू नये. माझ्यासह सर्वच जण या पक्षाचे कार्यकर्ते आहेत.कार्यकर्ते म्हणुन काम केल्यास पक्ष मजबूत होईल. असे म्हणत सर्वांनी समन्वय ठेवत एकत्र काम केले पाहिजे. कोणी स्वत:ला नेता समजत असेल किंवा गडबड करत असेल त्यांची तक्रार आपल्याकडे आल्यास त्याची गय केली जाणार नाही. माझाकडे कुठलीही चौकशी समिती नाही. त्यामुळे काम करतांना समन्वय ठेवा असा सज्जड दम देत एकत्र राहण्याचे आवाहन केले.
आगामी काळातील निवडणुकांमध्ये भुसावळ मतदार संघात कॉंग्रेेसचा तिरंगा फडकला पाहिजे अशा सपेक्षा व्यक्त केल्या. तसेच रेल्वे हद्दीत रेल्वे प्रशासनाकडून हटविण्यात आलेल्या झोपडपट्टी धारकांच्या पाठिशी असल्याचे सांगत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुराव करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेळ प्रसंगी झोपडपट्टी धारकांसाठी आंदोलनासाठी तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावर प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, आ. शिरीष चौधरी, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आ. रमेश चौधरी, माजी आ. निळकंठ फालक, प्रवक्ते अतुल लोंढे, अश्‍विन लोंढे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुनव्वर खान, ऍड. अविनाश भालेराव,विरेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष रवींद्र निकम, जामनेर तालुकाध्यक्ष एस.टी. पाटील,संतोष साळवे, शैलेश आहिरे, महिला आयोगाच्या माजी सदस्या जोत्स्ना विसपुते,युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कॉंग्रेसचा मुळ गाभा भुसावळात – माजी. खा. पाटील
भुसावळ, जामनेर व बोदवड तालुक्यातील जामा मित्रपक्षांकडे गेल्या आहेत. मात्र त्या ठिकाणी विरोधी उमेदवारांपेक्षा अधिक मताधिक्य आपल्याला असते. भुसावळ कॉंग्रेसचा मुळ गाभा आहे. त्यासाठी येथे कॉंग्रेसला जागा लढवायची आहे. जामनेरातही कॉंग्रेसला जामा मिळाल्यास माजी मंत्री गिरीष महाजन यांना ही घरी पाठवी असे सांगितले.
कार्यकर्त्यांमध्ये निराशा- माजी आ. फालक
गेल्या वीस वर्षांपासून भुसावळची जागा मित्रपक्षाकडे गेली आहे. त्यामुळे त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्ये कमी पडत आहे. हा प्रश्‍न यापूर्वीही वरिष्ठांकडे मांडला होता. त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. हा विषय गांभिर्याने घेऊन पक्षाला संजिवनी देण्याचे काम प्रदेशाध्यक्षांनी कराने असे आवाहन केले. सुत्रसंचालन अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुनव्वर खान यांनी तर प्रास्ताविक शहराध्यक्ष रवींद्र निकम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *