भुसावळ (प्रतिनिधी )–
अभियांत्रिकी शिक्षणात दैनंदिन अभ्यास करणे आवश्यक आहे. अभियंता ही केवळ पदवी नाही. ती एक वृत्ती आहे आणि ती अंगी यावी असे वाटत असेल तर जीवनात एक शिस्त आणावीच लागेल. प्रत्येक विषयात गती प्राप्त व्हावीच लागेल. त्यासाठी वेळेचे नियोजन व दैनंदिन अभ्यास या गोष्टी प्रत्यक्षात आणायला लागतील. अभियांत्रिकी पदवी ही शिडी म्हणून अनेकजण वापरतात, पण जर मनापासून अभ्यास केला तर जी गुणकौशल्ये आत्मसात होतील ती वाया जाणार नाहीत, ती आयुष्यभर आपल्याबरोबरच राहतील आणि त्याचा उपयोगही प्रत्येक ठिकाणी होतोच असे प्रतिपादन भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंडक्शन प्रोग्राम (अभियांत्रिकी शिक्षण प्रेरणा कार्यक्रम) मध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह यांनी केले.डीन डॉ. राहुल बारजिभे, विभाग प्रमुख डॉ. सुधीर ओझा, प्रा.अविनाश पाटील, डॉ.पंकज भंगाळे, डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.अजित चौधरी, डॉ. दिनेश पाटील उपस्थित होते.

बदलती जीवनशैली, जागतिकीकरण आणि उच्च शिक्षण तंत्रज्ञानामुळे आज विविध क्षेत्रात अभियंता म्हणून करीअर करण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात पाल्याला प्रवेश देऊन दिला म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे पालकांनीही समजू नये. विद्यार्थ्यांना दैनंदिन कार्यपद्धतीची पालकांनीसुद्धा विचारणा केली पाहिजे. विद्यार्थ्यांनीही आपला विकास कशात आहे, हे वेळीच ओळखून आत्मनिर्भर होण्यासाठी परिश्रम घेण्यास तयार व्हायला हवे. मन:पूर्वक अभ्यास करणे, अन्य चांगल्या शैक्षणिक/ सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, तसेच निर्थक गोष्टींमध्ये जाणारा वेळ वाचवणे हाच खऱ्या अर्थाने उत्तम अभियंता होण्याचा राजमार्ग आहे असेही प्राचार्य सिंह म्हणाले.
प्रा.किशोर चौधरी, प्रा.अनिकेत पाठक, प्रा.युवराज परदेशी, प्रा.अभिजित इंगळे यांनी परिश्रम घेतले.


