भुसावळ (प्रतिनिधी )-

शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र आयटीआय जवळ बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना चोरवड (ता. भुसावळ) जवळ उतरून तब्बल चार किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. तसेच उशीराने असल्यास शैक्षणिक नुकसान देखील होत असून विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
येथील जामनेर रोडवर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भुसावळ तालुक्यासह शेजारील इतर तालुक्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. हे प्रशिक्षण केंद्र शहराबाहेर असल्याने विद्यार्थ्यांना बसने ये-जा करावी लागते. मात्र आयटीआय समोर बस थांबा दिलेला असताना देखील बसवाहक या ठिकाणी बस थांबविण्यास नकार देतात. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात वाहकास विनंती केली असता, त्यांना अरेरावी केली जाते. तसेच उर्मटपणे वागणूक दिली जात असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बस आयटीआय जवळ न थांबता, पुढील चोरवड गावाजवळ थांबवली जाते. या गावापासून औद्योगिक प्रशिक्षण केंद्र तब्बल चार किलोमीटर अंतरावर आहे. येथून विद्यार्थ्यांना पायी यावे लागते, तर काही विद्यार्थी रिक्षाला भाडे खर्चून आयटीआय येत असतात. त्यामुळे आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागत आहे. बस थांबत नसल्याने बर्याचवेळा विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये येण्यास उशीर होतो. त्यामुळे सुरुवातीचे काही शैक्षणिक तास संपून जातात. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी एस टी महामंडळ प्रशासनास निवेदन दिले असून, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जवळ बस थांबविण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने एस टी महामंडळ प्रशासनाने आयटीआय जवळ बस थांबवण्याचे सूचना वाहक आणि चालक देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना भुसावळ आगारातून पासेस देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आयटीआय समोर बस थांबण्याच्या सूचना सर्व वाहक आणि चालक यांना आधीच दिल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत बस न थांबविणाऱ्या वाहक चालकास सूचना देण्यात येतील.
पी. बी. चौधरी, आगार प्रमुख, भुसावळ


