भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळातील सर्वच कोरोना उपचार केंद्रे बंद केल्याने तसेच तेथील आरोग्य सेवकांना कमी केल्याने आज दिनांक १ डिसेंबर रोजी भुसावळ उपविभागीय अधिकारी रामसिंह सुलाने यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. कोरोना ह्या आजाराचे संक्रमण रोखणे याकरिता प्रतिबंधात्मक उपायांमध्ये कायम सातत्य ठेवणे गरजेचे आहे. ज्या भुसावळात कोरोना थांबविण्यात यश मिळविले असताना पुन्हा तेथे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणचे रुग्ण सापडणे थांबणे म्हणजे कोरोना संपला असे म्हणणे उचित ठरणार नाही म्हणून केंद्र सुरू ठेवण्यासाठी शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले.
कोरोना काळात आरोग्यसेवकांचे कार्य अप्रतिम: बबलू बऱ्हाटे
भुसावळातील रुग्णसंख्येचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना काळात आरोग्यसेवकांचे कार्य अप्रतिम आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जितके नवीन रुग्ण निर्माण होत आहे त्यांना योग्य उपचार मिळावेत म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढत आहे. पहिल्या लाटेत खरे तर कोरोनाचे संक्रमण इतक्या झपाट्याने वाढू शकते हयाचा अंदाज वर्तविण्यास आरोग्य व्यवस्था कमी पडली की काय असे चित्र पाहायला मिळाळे होते.
कोरोनाची लस येई पर्यंत केंद्रे सुरू ठेवा: दीपक धांडे
देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असतांना भुसावळातील काही कोविड सेंटर बंद करणे व आरोग्य सेवकांना कामावरून कमी केले जाणार असल्याचे चर्चेत आहे. कोविड सेंटरमुळे भुसावळातील गोरगरीब रुग्णांवर योग्य उपचार झाले अन्य खाजगी ठिकाणी त्यांचे उपचार करणे आर्थिक दृष्टया शक्य नव्हत. कोरोनाची लस येई पर्यंत भुसावळमधील कोरोना सेंटरवरील आरोग्य सेवक व सेंटर कार्यान्वित ठेवावे अशी मागणी दीपक धांडे यांनी केली.
शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, शहर संघटक योगेश बागुल, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, उपशहर प्रमुख सोनी ठाकूर, स्वप्नील सावळे उपशहर संघटक अब्दुल नबी पटेल, युवा सेना शहर प्रमुख सुरज पाटील, गोकुळ बाविस्कर, मोहसीन तडवी व पदाधिकारी तसेच डॉ.प्राजक्ता नेवे, शशिकांत अहिरे, माधुरी सुरवाडे, विक्की मेश्राम, लीना पाथरवट, शिरीन तडवी, जयश्री सपकाळे, नजराणा तडवी हे कोरोना योद्धे उपस्थित होते.
आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार:
रावेर, यावल, बोदवड मुक्ताईनगरच्या रुग्णांवर भुसावळात उपचार झाले, आणि आता तेथील रुग्ण संख्या भुसावळ पेक्षा कमी असून सुद्धा भुसावळचे केंद्रे बंद करण्यात आली. अचानक रुग्ण वाढल्या नंतर आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार आहे म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन पाठवले असून शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे असे प्रा.धिरज पाटील यांनी कळविले आहे.



