भुसावळ पालिका रुग्णालयात पाणीच पाणी ; रुग्णांचे हाल ; नगरपालिका मुख्य रुग्णालयाच्या नूतनीकरण व डागडुजीच्या कामाची चौकशी करावी – शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांची मागणी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
नगरपालिकेच्या श्री संत गाडगेबाबा या दवाखान्यामध्ये कोरोना संशयित रुग्णांची स्वब टेस्टिंग सुरू आहे.आज गुरुवार दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ७ नंतर अचानक जोरदार पाऊस भुसावळमध्ये झाला, या जोरदार पावसामुळे दवाखान्यात काही रूममध्ये दयनीय अवस्था झाली. पाणीच भरले अश्या परिस्थितीमध्ये स्वब देणे अत्यंत धोकेदायक आहे. मागील वर्षी केल्या गेलेल्या लाखो रुपयांच्या डागडुजी व नूतनीकरणाचा फायदा झालेला नसून या नूतनीकरणमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे चित्र या पावसामुळे आज स्पष्ट झाल्याचे मत स्वब देणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केले. शहरात कोरोना सोबत इतर आजारांची समस्यासुद्धा वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीत दवाखान्यात सोयी सुविधा मिळत नसतील तर नगरपालिका प्रशासनाने केलेल्या नूतनीकरणाच्या कामाचा फायदा काय असे सवाल नागरिक उपस्थित करीत आहे. भुसावळ नगरपालिका रुग्णालय म्हणजे आता निव्वळ पैसा कमवण्याचा साधन आहे. चांगले रस्ते, शुद्ध पाणी, स्वच्छता आणि आता आरोग्य सुविधा देण्यामध्ये भुसावळ नगरपालिका प्रशासन व भाजपचा सत्ताधारी हे प्रत्येक वर्षी नापास झालेले आहेत असेही नागरिक म्हणाले.
१५१ कोटी ५६ लाख १५ हजार ८४७ रुपयांचा निधी नगरपालिका खर्च करणार असेल आणि त्यामध्ये जर अशा प्रकारचे निकृष्ट कामे होत असतील तर नागरिकांनी कर रुपी दिलेल्या पैसाचा अपव्यय झाला आहे म्हणून याची चौकशी झाली पाहिजे. जनतेच्या डोळ्यांमध्ये फक्त धूळफेक केली जात आहे असे स्वब दिलेल्या नागरिकांनी सांगितले. नगरपालिका दवाखान्यामध्ये असलेल्या असुविधा बघितल्या गेल्यास प्रशासन उदासीन असल्याचे जाणवत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण करायचे आणि फक्त बिले काढायची आणि पुढच्या वर्षी परत नूतनीकरण करायचे हा कारभार मागील पाच वर्षांपासून सतत सुरू आहे.
यामुळे उपचारासाठी आलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार याची माहिती असून सुद्धा योग्य नियोजन प्रशासनाने केलेले नाहीये. बऱ्याच सुविधा या कागदोपत्री असून प्रत्यक्षात तिथेच काहीच नाही. सुधारणा करा असं वारंवार जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनी सांगितले असल्यानंतर सुद्धा दवाखान्यामध्ये कोणतीही सुविधा नाही, याची एक भुसावळकर म्हणून आम्हाला लाज वाटते असे नागरिकांनी यावेळी म्हटले.
भुसावळ शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना इतर संसर्गजन्य आजार वाढण्याचे निमंत्रण याठिकाणी दिले जात आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असताना अधिकारी गुपचूप कसे? नगरपालिका दवाखाना म्हणजे गोरगरिबांसाठी आधार असतो आणि अश्यात इतर संसर्गजन्य आजाराने ग्रस्त झाल्यास त्यांच्याकडे बघणार कोण? म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून पालक मंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडेसुद्धा पोच पाठवली आहे. या सर्व परिस्थितीला जबाबदार असणारे ठेकेदार व सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी तसेच येथे केलेल्या कामांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी भुसावळ नगरपालिकचे मुख्याधिकारी संदीप चद्रावर यांच्याकडे निवेदन
सादर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *