९० दिवसात विकास करण्याचे खोटे आश्वासन देणार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा – शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांची पत्रकाद्वारे मागणी


भुसावळ (प्रतिनिध)-
भुसावळकरांच्या समस्या सुटण्यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केल्यानंतर शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र ९० दिवसात भुसावळचा विकास करून दाखवू, असे आश्‍वासन देवून भुसावळकरांची फसवणूक करणार्‍या भाजपा सत्ताधार्‍यांवरच फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी सर्वसामान्य जनतेची भावना असल्याचे पत्रक शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
चार वर्षांपासून शहराला अशुद्ध पाणीपुरवठा होत असून खड्डेमय रस्त्यांमुळे शहरवासीयांना पाठीचे विकार जडले आहेत. समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही उपयोग झाला नाही तर कोरोनाचे रुग्ण वाढले आणि नागरीकांमध्ये भीती निर्माण झाली. शहरवासीयांच्या समस्या घेवून शिवसैनिकांनी आंदोलन करीत घोषणाबाजी केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत असल्याचा आरोप बर्‍हाटे यांनी केला आहे. पोलिस प्रशासनाला चुकीची माहिती देऊन विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे मात्र शिवसेना पक्ष नेहमीच जनसामान्यांना न्याय देण्यासाठी तत्पर असून गुन्हे दाखल झाले तरी आठवडाभरात सर्व समस्या न सुटल्यास पालिका प्रशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा भुसावळच्या विविध भागातून काढली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन व इतर पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना प्रत्यक्ष भेटून भुसावळ नगरपालिकाच्या बोगस कारभाराची माहिती मांडणार असल्याचे शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *