भुसावळ, प्रतिनिधी : सततच्या पावसामुळे तापी नदीवरील हतनूर प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, शनिवारी (दि. 4 जुलै 2026) सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणात एकूण 71.91 टक्के जलसाठा नोंदविण्यात आला आहे. धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने धरणाचे 18 रेडियल दरवाजे प्रत्येकी 1.00 मीटरने उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला आहे. प्राप्त माहितीनुसार, हतनूर धरणाची सध्याची पाणीपातळी 211.960 मीटर असून, धरणाची पूर्ण जलसाठा पातळी (एफआरएल) 214.000 मीटर आहे. धरणातील एकूण (ग्रॉस) जलसाठा 279.00 दशलक्ष घनमीटर (71.91 टक्के) इतका असून, उपयुक्त (लाईव्ह) जलसाठा 146.00 दशलक्ष घनमीटर (57.25 टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे. धरणाच्या 18 रेडियल दरवाजांतून सध्या 1116 घनमीटर प्रति सेकंद (39,412 क्युसेक) इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच कालव्यातून 8.50 घनमीटर प्रति सेकंद (300 क्युसेक) पाणी सोडण्यात येत असून, आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. आजच्या दिवसभरात धरण क्षेत्रात 28 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान 76 मिलीमीटरपर्यंत पोहोचले आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


