भुसावळ, दि. १ जुलै (प्रतिनिधी) : रेल्वेचे लोखंड चोरी करण्याच्या उद्देशाने गेलेल्या तिघांचा एका व्यक्तीसोबत झालेला वाद जीवघेणा ठरला. या वादातून झालेल्या बेदम मारहाणीत पुजारी संतोष रघुवीर मंचल (वय ५५) यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून, भुसावळ शहर पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत संतोष रघुवीर मंचल यांना दिनांक २८ जून २०२६ रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी तोंडावर, छातीवर तसेच हाताबुक्क्यांनी व लाथांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. त्यामध्ये आरोपी म्हणून क्षितिज संजय भालेराव (रा. ZTC, भुसावळ), प्रफुल उत्तम जाधव (रा. कोळीवाडा, जुना सातारा, भुसावळ) आणि हर्षल राजू वर्मा (रा. ZTC, भुसावळ) यांची नावे समोर आली. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी २८ जूनच्या रात्री रेल्वेचे लोखंड चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते. त्यावेळी त्यांचा संतोष मंचल यांच्याशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात आरोपींनी संतोष मंचल यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यामागील इतर बाबींचा तपास आणि पुढील चौकशी भुसावळ शहर पोलीस करीत आहेत.



