भुसावळ(प्रतिनिधी ) - दि. ३० जून : भुसावळ तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आज दि. ३० जून २०२६ रोजी म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोस्को कायदा, रॅगिंगविरोधी कायदे, बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच सामाजिक व शैक्षणिक अडचणींवर मात करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अॅड. जास्वंदी भंडारी यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोस्को) कायद्याविषयी माहिती देत 'गुड टच' आणि 'बॅड टच' या संकल्पनांचे सोदाहरण स्पष्टीकरण केले. तसेच अँटी रॅगिंग कायदा आणि 'बालविवाहमुक्त भारत' या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती देऊन जनजागृती केली. यावेळी अॅड. भंडारी यांनी "कायद्याचे ज्ञान म्हणजे स्वसंरक्षणाचे हत्यार" असे सांगत विद्यार्थ्यांनी आपले हक्क व कर्तव्ये जाणून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार किंवा दबावाला बळी न पडता त्याविरोधात ठाम भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा अडचण निर्माण झाल्यास ती निमूटपणे सहन न करता वेळेवर तक्रार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. प्रसंगी समांतर विधी सहाय्यक (पीएलव्ही) तथा पत्रकार उज्वला बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत विधी सेवा समितीची उद्दिष्टे, कार्यपद्धती व विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मुख्याध्यापक व्ही.पी. सुलताने यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने, सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, डॉ. प्रदीप साखरे, संजीव चौधरी, नाना पाटील, मनोज किरंगे, संध्या धांडे, ज्योती शिरतुरे, रेखा सोनवणे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नरेंद्र राठोड यांनी केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



