भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील महामार्गावरील वांजोळा चौक आणि परिसर सध्या वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून हा चौक अक्षरशः ‘अपघातांचा सापळा’ बनला आहे. गेल्या अवघ्या एका महिन्यात या परिसरात तब्बल १० अपघात घडल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, या वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, चौकातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी, भरधाव वेगाने धावणारी वाहने, अपुरे दिशादर्शक फलक तसेच काही ठिकाणी रस्त्याची खराब अवस्था यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची मोठी गर्दी होत असल्याने अपघातांचा धोका अधिक वाढत आहे. महिनाभरात १० अपघात; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी गेल्या महिन्यात झालेल्या अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती मिळाली आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तातडीच्या उपाययोजनांची मागणी वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वांजोळा चौकात गतिरोधक उभारणे, वाहतूक सिग्नल बसविणे, रस्ते सुरक्षा फलक लावणे, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे तसेच वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिकांनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचा इशारा दिला आहे.


