जोगलखोरी शिवारात तीन दिवसांपासून वीज गुल; ४५ अंश तापमानात केळी-लिंबू बागा जळाल्या, शेतकरी हवालदिल

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी शेत शिवारात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वीज पुरवठा पूर्णपणे खंडित असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. भीषण उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सिंचन व्यवस्था ठप्प झाल्याने केळी व लिंबू बागा जळू लागल्या असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या परिसरात तापमान तब्बल ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी झाडे वाळण्यास सुरुवात झाली असून, हाता-तोंडाशी आलेले पीक धोक्यात आले आहे.

जोगलखोरी शिवारातील विद्युत लाईन तांत्रिक कारणामुळे बंद असल्याचे सांगितले जात असले, तरी महावितरण प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. लाईट नसल्यामुळे मोटारी बंद पडल्या असून, सिंचनासह गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महावितरण प्रशासनाला तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करत इशारा दिला आहे की, “४५ अंश तापमानात शेतकरी उघड्या डोळ्यांनी आपल्या बागा जळताना पाहत आहे. प्रशासनाने तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत केला नाही, तर शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.”

जोगलखोरी परिसरातील शेतकरी सध्या हवालदिल झाले असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह शिशिर जावळे यांनी केली आहे.