भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट नागरिकांसाठी गंभीर समस्या बनत असून शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच एका शाळकरी मुलाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत माजी नगरसेवक, पत्रकार तथा राज्य शासन वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्री. दिलीप सुरवाडे यांनी तीव्र संताप व्यक्त करत भुसावळ नगरपालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. “नगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून तातडीने उपाययोजना न झाल्यास अनेकांचे जीव धोक्यात येऊ शकतात,” असे त्यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले. “जर नगरपालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही, तर नागरिक व शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही न्यायालयात दाद मागू,” असा इशारा त्यांनी दिला.
तसेच शहरातील जागृत नागरिकांनी आपल्या परिसरातील भटक्या कुत्र्यांचे फोटो व तक्रार अर्ज स्वतःकडे पाठवावेत, असे आवाहनही दिलीप सुरवाडे यांनी केले आहे.


