भुसावळ प्रतिनिधी : वरणगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर ठरत असून अखेर संतप्त नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरपालिका प्रशासनाला विशेष मोहीम राबवावी लागली. मंगळवारी सकाळपासून शहरातील विविध भागांत धडक कारवाई करत पालिकेच्या पथकाने तब्बल ३५ ते ४० भटकी कुत्री पकडली. या कारवाईमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रेल्वे स्टेशन रोड, भवानी नगर, गांधी चौक, प्रतिभा नगर, रामपेठ नागरी, फॅक्टरी रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, लोहार गल्ली तसेच भोगावती नदी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर कुत्र्यांचे टोळके मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुचाकीस्वारांच्या मागे धावणे, नागरिकांवर भुंकणे, लहान मुलांना घाबरवणे तसेच चावा घेण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे दाखल होत होत्या.
विशेषतः शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भवानी नगर परिसरात महिनाभरापूर्वी चार ते पाच नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली होती. तर दोन दिवसांपूर्वी फॅक्टरी रोड परिसरात एका व्यक्तीवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षा अरुणाताई इंगळे यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदन देत भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. “नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर पालिकेने तातडीने विशेष मोहीम सुरू केली.
मंगळवारी सकाळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्टेशन रोड व नगरपालिका परिसरातून मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर नाथ शाळेजवळील परिसर, प्रतिभा नगर, भोगावती नदी परिसर, लोहार गल्ली, जुनी नगरपालिका, गांधी चौक आदी भागांतून भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आले. अनेक ठिकाणी कुत्र्यांचे टोळके आक्रमक झाल्याने कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.
दरम्यान, “फक्त कुत्री पकडून प्रश्न सुटणार नाही. नसबंदी, लसीकरण आणि भटक्या प्राण्यांच्या नियंत्रणासाठी कायमस्वरूपी नियोजन आवश्यक आहे,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील वाढत्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले सर्वाधिक भयभीत असल्याचे चित्र सध्या वरणगावात पाहायला मिळत आहे.


