भुसावळ (प्रतिनिधी):
साकेगाव येथून आपल्या गावाकडे परतणाऱ्या एका तरुण दुचाकीस्वाराचा जोगलखेडा रोडवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ज्ञानेश्वर चिंदू सोनवणे (वय २८, रा. भानखेडा, ता. भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात दुचाकी विद्युत खांबाला धडकल्याने झाला की एखाद्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने, याबाबत अद्याप संभ्रम असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, १२ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर सोनवणे हे साकेगावहून भानखेडा गावाकडे दुचाकीने येत होते. गावाच्या साधारण एक किलोमीटर आधीच जोगलखेडा रोडवर त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. अपघातानंतर ज्ञानेश्वर यांना तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
मृत ज्ञानेश्वर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. घरातील तरुण कर्ता पुरुष गेल्याने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रात्री ८ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात भानखेडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलीस तपास सुरू
या घटनेबाबत नितीन चिंदू सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ‘बीएनएसएस’ २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे (नोंद क्र. १७/२०२६). पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय भोई या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.



