भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात बालविवाह लावून दिल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी वर-वधूच्या पालकांसह एकूण पाच जणांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 12 वाजता एका अज्ञात व्यक्तीने चाइल्ड हेल्पलाइन (1098) वर संपर्क साधून शहरातील तेली समाज मंगल कार्यालयात बालविवाह सुरू असल्याची माहिती दिली. या तक्रारीची तत्काळ दखल घेत पोलिसांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पथक घटनास्थळी रवाना केले.
दुपारी 1 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास पथक घटनास्थळी पोहोचले असता विवाहाचे सर्व विधी पूर्ण झाल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी मुलाच्या वडिलांकडे जन्मदाखल्याची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ करत विलंब केला.
दरम्यान, 1 मे रोजी जळगाव येथील बालकल्याण समितीकडे मुलीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत सादर करण्यात आली. या दाखल्यावरून मुलगी विवाहाच्या दिवशी 17 वर्षे 8 महिन्यांची असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत वर-वधूच्या पालकांसह इतर पाच जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


