भुसावळ (प्रतिनिधी )– वंशिका प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त “कोण होणार आवाज भीमाचा” ही भव्य भीमगीत कराओके गायन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण २७ स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत वातावरण भीममय केले.

कार्यक्रमाला भुसावळ नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. सीमाताई नरवाडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राजेश मानवतकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास तायडे, सेवानिवृत्त रेल्वे टी.सी. राजेंद्र तायडे तसेच इस्तु शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे परीक्षण संगीत विशारद सौ. सुधा राशदवार आणि सौ. अर्चना रणधीर यांनी केले.
स्पर्धेचा निकाल जाहीर करताना जामनेर येथील कुर्बान शाह यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मुक्ताईनगर येथील सौ. सीमा इंगळे यांनी द्वितीय तर भुसावळ येथील संजय निकम यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करून त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी सोनवणे यांनी केले, तर विवेक नरवाडे यांनी आभार प्रदर्शन केले.


