भुसावळात प्रशासकीय दिरंगाई विरोधात ‘खटिया टाको’ आंदोलनाचा इशारा :

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रशासनाकडून आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने त्रस्त झालेल्या एका नागरिकाने आता थेट आंदोलनाचा अनोखा मार्ग स्वीकारला आहे. प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी आपल्या पत्नीसह २० एप्रिल २०२६ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ‘खटिया टाको’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जागेवरील अतिक्रमण हटवण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच आदेश दिले होते. मात्र, दीर्घकाळ उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या विरोधात पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला, परंतु त्यांना न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर, १९ एप्रिल २०२६ पर्यंत अतिक्रमण हटवण्यात आले नाही तर २० एप्रिलपासून सकाळी १० वाजता प्रांत कार्यालयासमोर खाटा टाकून उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रमोद पाटील यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, ते सध्या गंभीर त्वचारोगाने त्रस्त आहेत. उपोषणादरम्यान त्यांच्या प्रकृतीला काहीही इजा झाल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी उपविभागीय अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी अर्जासोबत वैद्यकीय अहवालही जोडले आहेत.

“मी प्रशासनाला वारंवार विनंती केली आहे, पण आदेशाची अंमलबजावणी होत नाहीये. माझ्या आजारपणामुळे मला त्रास होत असतानाही, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मला पत्नीसह खाटा टाकून कार्यालयासमोर बसावे लागत आहे,” असे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, या आंदोलनाबाबत तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनालाही माहिती देण्यात आली आहे. आता १९ एप्रिलपर्यंत प्रशासन कारवाई करते की पाटील दाम्पत्याला आंदोलनावर बसावे लागते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.