भुसावळ (प्रतिनिधी )– यावल तालुक्यातील पाडळसे जवळील अकलूद शिवारात आयोजित सातदिवसीय श्री शिवमहापुराण कथेचा सोमवारी मोठ्या भक्तिभावात समारोप झाला. प्रख्यात कथाकार पं. प्रदीप मिश्रा यांनी भक्तांना अध्यात्मिक मार्गदर्शन करत जीवनातील दुःखांवर उपाय सांगितले.

कथेदरम्यान त्यांनी सांगितले की, मनुष्य जन्म हा मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी भक्तिमार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. भगवान शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करून त्याचे आचमन केल्यास कायिक, वाचिक आणि मानसिक ताप दूर होतात, असे त्यांनी नमूद केले. शिवमहापुराण मध्येही याचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.

“भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी द्या”
पं. मिश्रा यांनी सांगितले की, भगवान शिव भक्तांची विविध रूपात परीक्षा घेतात. त्यामुळे गरजूंना मदत करणे हेच खरे पुण्य असून भुकेल्याला अन्न व तहानलेल्याला पाणी देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
दिखाऊ भक्ती टाळण्याचा सल्ला – भोईंच्या निस्वार्थ सेवेमुळेच हा धार्मिक सोहळा यशस्वी
भक्ती करताना दिखावा करू नये, असे आवाहन करत त्यांनी आयोजक भोई परिवाराचे कौतुक केले. भोई परिवाराचा वीटभट्टीचा व्यवसाय असून सन २०१८ पासून दरवर्षी पहिल्या भट्ट्यातील टुकभर बीट ते सिहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये पाठवतात. ते अशी सेवा करतात हे माहिती नव्हते. त्यांनी कधीही भक्तीचा देखावा केला नाही, यामुळेच शिवमहापुराण कथा भुसावळात झाली. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळेच हा धार्मिक सोहळा यशस्वी झाल्याचे सांगितले.
“पद नव्हे, वागणूक महत्त्वाची”
समाजात सन्मान हा पदामुळे मिळतो, मात्र खरा आदर चांगल्या वर्तनामुळे मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली वागणूक सुधारावी, असा संदेश त्यांनी दिला.
५ लाख भाविकांची उपस्थिती
समारोपाच्या दिवशी सुमारे ५ लाख भाविकांनी उपस्थिती लावल्याचा आयोजकांचा दावा आहे. पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली होती. महाआरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
वाहतूक कोंडी; भाविकांची पायी वाटचाल
कथेचा समारोप होताच परिसरातील सर्व मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तापमान सुमारे ४० अंशांपर्यंत असतानाही अनेक भाविकांनी बसस्थानक व रेल्वे स्टेशनपर्यंत पायी प्रवास केला. प्रशासन व एसटी विभागाने अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली.
भावनिक निरोप
सात दिवस चाललेल्या या कथेने भाविकांना मंत्रमुग्ध केले. समारोपावेळी अनेक भाविक भावूक झाले. वअभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं, असे फलक भाविकांच्या हातात झळकले काहींनी कथा स्थळाची माती कपाळाला लावून निरोप घेतला.
कलशयात्रेपासून महाआरतीपर्यंत
१० मार्च रोजी भव्य कलशयात्रेने या कथेची सुरुवात झाली होती. सप्ताहभर विविध धार्मिक प्रसंगांचे वर्णन करण्यात आले आणि १६ मार्च रोजी महाआरतीने कथेचा समारोप झाला.
एकंदरीत, या शिवमहापुराण कथेने परिसर पूर्णतः शिवमय झाला होता पंडित मिश्रा जी यांनी भक्ती, सेवा आणि सदाचाराचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवला.



