वरणगावात राजकीय श्रेयवादामुळे नागरिकांचे हाल; रेशन शिबीर रद्द झाल्याने संतप्त मोर्चा

भुसावळ (प्रतिनिधी) – वरणगाव येथे रेशन कार्ड समस्यांसाठी आयोजित करण्यात आलेले शिबीर ऐनवेळी रद्द झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. तहसील प्रशासनाच्या होकारानंतर अचानक नकार देण्यात आल्याने शेकडो नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून या प्रकारामुळे स्थानिक राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.

मंडळ स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अंतर्गत १६ मार्च रोजी वरणगाव नगरपरिषद येथे रेशन कार्डसंदर्भातील विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. या शिबिरात रेशन कार्ड नोंदणी, १४ अंकी क्रमांक, नाव समावेश किंवा वगळणे अशा महत्त्वाच्या कामांसाठी नागरिक मोठ्या अपेक्षेने उपस्थित राहणार होते.

मात्र, श्रेयवादाच्या राजकारणामुळे तहसीलदारांनी अखेरच्या क्षणी शिबीर रद्द केल्याची चर्चा रंगली आहे. परिणामी, सकाळपासून नगरपरिषदेत जमलेल्या सुमारे ३०० हून अधिक नागरिकांची निराशा झाली. अनेकांनी आपला दिवसाचा रोजगार सोडून येथे हजेरी लावली होती.

नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नागरिकांची नोंद घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. मात्र, शिबीर पुढे ढकलल्याची माहिती मिळताच उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. “अखेर कोणाच्या आदेशावरून शिबीर रद्द झाले?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

यानंतर संतप्त नागरिकांनी दुपारी वरणगावहून भुसावळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. सुमारे ३०० नागरिकांनी तहसील कार्यालयात दाखल होत प्रशासनाकडे जाब विचारला.

दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे शिबीर पुढे ढकलण्यात आले आहे. पुरवठा विभागाकडून या तुटवड्याची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

तहसीलदार नीता लबडे यांनी नागरिकांची दिलगिरी व्यक्त करत लवकरच नव्या तारखेस शिबीर आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. “नागरिकांनी संयम ठेवावा, प्रशासन त्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेमुळे काही काळ वरणगाव परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत शांतता प्रस्थापित केली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली असून राजकीय नेते व स्थानिक नागरिकांकडून प्रशासनावर टीका केली जात आहे.