शिंदी, ता. भुसावळ : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मानवतेचा व शांतीचा मार्ग दाखवला असून सत्कर्म करणाऱ्यांवर परमेश्वर नेहमी प्रेम करतो, अशी शिकवण पवित्र कुराण देते, असे प्रतिपादन माजी ग्रामपंचायत सदस्य सईद नथू पिंजारी यांनी केले.

रमजान महिन्याच्या निमित्ताने शिंदी येथील नुरानी मस्जिद येथे प्रथमच इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य युनुसशहा सरोवरशहा व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश नेमाडे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.व
यावेळी सर्व धर्मीय बांधवांना संबोधित करताना सईद पिंजारी यांनी सांगितले की, रमजान हा पवित्र महिना असून संयम, त्याग, शिस्त आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. या महिन्यात गरीब व गरजूंची मदत करणे, जकात देणे तसेच समाजात बंधुभाव व सलोखा जपणे यावर विशेष भर दिला जातो.
सामाजिक कार्यकर्ते गिरीश नेमाडे यांनी सांगितले की, गावात प्रथमच इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून सर्व धर्मीय बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. यामुळे गावात सामाजिक ऐक्य व सलोख्याचे वातावरण अधिक दृढ होण्यास मदत होईल.
यावेळी युनुसशहा सरोवरशहा यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि समाजहिताच्या उपक्रमांवर आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाला मौलाना युसुफ शहा, हसन बुढन दरवेशी, नशीरशहा गुलाब शहा, अन्सारशहा नजीरशहा, चांदशहा नादरशहा, दिलावरशहा इमामशहा, नबी सिकंदर पिंजारी, पोलीस पाटील अतुल पाटील, सरपंचपती तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप सपकाळे, माजी सरपंच संतोष गायकवाड (भिल्ल), माजी उपसरपंच भीमराव तायडे, माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप कोल्हे, माजी विकास सदस्य देविदास गाढेकर (पाटील), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कोळी, अर्जुन धांडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा तालुकाध्यक्ष जगदीश पाटील, विकास सोसायटी कर्मचारी दीपक अडवकर, नरेंद्र (बाळू) धांडे, विद्याधर नेहेते, अनिल कोल्हे आदींसह सर्व धर्मीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या इफ्तार पार्टीमुळे गावात सामाजिक ऐक्य व एकोप्याचा संदेश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


