मुंबई/सोलापूर : मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने जीआरपीच्या समन्वयाने दोन स्वतंत्र कारवायांमध्ये चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. इगतपुरी–कसारा घाट विभागात सक्रिय असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात आले असून सोलापूर विभागातही एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

प्रकरण १ : मंगला एक्सप्रेसमधील चोरी उघड
इगतपुरी–कसारा घाट परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आरपीएफने विशेष संयुक्त पथक स्थापन केले होते. या पथकात कसारा व इगतपुरी येथील आरपीएफ कर्मचारी, गुन्हे प्रतिबंधक व शोध पथक (सीपीडीएस) तसेच जीआरपी/इगतपुरी यांचा समावेश होता. घाट व डोंगराळ भागात संशयितांवर गुप्तपणे पाळत ठेवण्यात येत होती.
दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पाळत ठेवताना ट्रेन क्र. १२६१८ अप एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेसमध्ये प्रवाशाच्या सामानाची चोरी करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. रवींद्र नामदेव धोगंडे (वय २६, रा. खडवली) आणि करण भीमराव भालेराव (वय १९, रा. आसनगाव) यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांच्या साथीदार कल्पेश कानू आरे (वय २४, रा. बलवंडी) यालाही अटक करण्यात आली.
आरोपींकडून मंगळसूत्र, कानातले, नाकातले असे सोन्याचे दागिने तसेच ६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या टोळीविरुद्ध अंदाजे पाच चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पुढील तपास जीआरपी/इगतपुरी करत आहे.
प्रकरण २….चेन्नई–एकतानगर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये आरोपी जेरबंद
दि. १७ जानेवारी २०२६ रोजी ट्रेन क्र. २०९१९ चेन्नई–एकतानगर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये गुन्हे प्रतिबंधक कर्तव्यावर आरपीएफ व जीआरपीचे संयुक्त पथक तैनात होते. पहाटे सुमारे ५.३० वाजता दुधनी स्थानकात एक संशयित व्यक्ती आरक्षित डब्यातून जनरल डब्याकडे धावताना आढळली.
पथकाने त्याला ताब्यात घेतले असता, बेल्लारी (कर्नाटक) येथील रहिवासी गोपीकृष्ण असल्याचे समोर आले. त्याने तीन मोबाईल फोन व ५,१०० रुपये रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. तपासात त्याच्याकडून सुमारे १.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात आयफोनसह मोबाईल फोन, मनगटी घड्याळ, पॉवर बँक, चार्जर आणि इअरफोन्स यांचा समावेश आहे.
आरोपीविरुद्ध भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम ३०५, ३०५(सी) आणि १४७ अन्वये एसीआर क्रमांक ०२/२०२६ नोंदवण्यात आला असून पुढील तपास जीआरपी/सोलापूर करत आहे.

प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन
मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ व जीआरपीच्या समन्वित प्रयत्नांचे कौतुक केले आहे. प्रवाशांनी सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना द्यावी किंवा मदतीसाठी १३९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


