चोपडा – जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सोमवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. चोपडा–विरवाडा मार्गावर भरधाव वेगातील अर्टिका कार दुभाजकावर जोरात आदळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही तरुण गेल्या आठ दिवसांपासून जैन धर्मीयांच्या पारमार्थिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ते विरवाडा येथून चोपड्याकडे परतत होते. दरम्यान, कार (MH 19 BS 1008) वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन दुभाजकावर आदळले. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
या अपघातात राहुल अमृत भोई आणि मयुर अरुण राजपूत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर विजय अमृत भोई (वय ३५), राकू राजपूत (वय ३०) आणि बंटी कोळी (वय ३०) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींपैकी विजय भोई यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. राकू राजपूत आणि बंटी कोळी यांच्या हात-पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर चोपडा येथील मोरेश्वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे चोपडा परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


