ब्राह्मण संघ भुसावळतर्फे रामदास नवमीनिमित्त मनाच्या श्लोकांवर डॉ. सुषमा खानापूरकरांचे व्याख्यान

भुसावळ (प्रतिनिधी) – ब्राह्मण संघ भुसावळच्या वतीने रामदास नवमीनिमित्त बुधवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी समर्थ रामदासस्वामींनी रचलेल्या ‘मनाच्या श्लोकां’वर आधारित प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संस्कृत भाषेच्या प्रचारक डॉ. सुषमा खानापूरकर यांनी अभ्यासपूर्ण आणि उदाहरणांसहित मार्गदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.

आपल्या व्याख्यानात डॉ. खानापूरकर यांनी समर्थांच्या मनाच्या श्लोकांचे आजच्या दैनंदिन जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. “मना सज्जना भक्तिपंथेचि जावे…” या श्लोकाच्या आधारे मनाला सज्जनतेने व भक्तीच्या मार्गाने नेल्यास जीवनातील ताणतणाव व संघर्ष कमी होऊन चांगल्या आचरणातून भगवंताची कृपा प्राप्त होते, असे त्यांनी सांगितले. तसेच “नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे…” या श्लोकाद्वारे परक्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवू नये, स्वकष्टाने धन संपादन करावे, असा संदेश समर्थांनी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“जगी सर्व सुखी असा कोण आहे…” या ओवीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, जीवनात दुःख व संघर्ष अटळ आहेत. प्रभू रामांनाही वनवास व अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यामुळे रामभक्ती म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत धैर्याने उभे राहण्याची शिकवण होय. तसेच “नका करु खटपट, पहा माझा ग्रंथ नीट…” या ओवीद्वारे समर्थांनी दासबोध व मनाचे श्लोक यांचा केवळ पारायण न करता चिंतन आणि आचरण करण्याचा संदेश दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष गणेश वढवेकर यांनी समर्थ रामदासस्वामींविषयी काही समाजघटकांत असलेल्या गैरसमजांचा उल्लेख केला. हे गैरसमज दूर करण्यासाठी मनाचे श्लोक व दासबोधातील समाज व राष्ट्रहिताचे तत्त्वज्ञान यांचा प्रसार-प्रचार करणे हे आपले धर्मकर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर मनाच्या श्लोकांचे सामूहिक पठण करण्यात आले. आरतीनंतर समर्थ परंपरेनुसार समाजबांधवांनी दिलेल्या डाळ-तांदूळ व आर्थिक सहकार्यरूप भिक्षेतून कढी-खिचडीचा प्रसाद देण्यात आला.

या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. दिलीपराव ओक, श्री. सुरेशराव कुलकर्णी, डी. एल. हिंदी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. रमेश जोशी, संगीत शिक्षक मुकेश खपली आदी मान्यवर उपस्थित होते. सचिव महेंद्र गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष आमोद टेंभुर्णीकर, पंकज जोशी, जयंत जोशी, शंतनू गचके, प्रतीक बोचरे, श्रीमती कल्पना दामले, अशोक पाटील, विकी इंगळे, प्रज्ञा संत, सौ. सोहळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. पंकज जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. प्रसाद भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.