यावल ( प्रतिनिधी ) –

रावेर व यावल तालुक्यात अचानक कोसळलेल्या अवकाळी वादळी पावसाने व गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या गारांच्या माऱ्यानंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे.
हाता-तोंडाशी आलेली पिके निसर्गाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार गारपिटीमुळे केळी, गहू, हरभरा, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील अनेक घरांची पत्रे उडून मालमत्तेचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत रावेर–यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. अमोल जावळे यांनी प्रशासनाला तात्काळ नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्वरित पाहणी करून शासनाकडून योग्य ती मदत मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी सुरू असून पंचनामा प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी पुढील कार्यवाही युद्धपातळीवर राबवली जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


