जळगाव (प्रतिनिधी )
धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्र’ अर्थात रामराज्याच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनी केले. येत्या १ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील मानराज पार्क, श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानावर सायंकाळी ५ वाजता आयोजित ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’च्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरि महाराज, सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, सकल हिंदु समाजाचे राकेश लोहार तसेच हिंदु जनजागृती समितीचे जळगाव शहर समन्वयक गजानन तांबट उपस्थित होते.
प्रशांत जुवेकर म्हणाले, “जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, तेव्हा धर्मरक्षणासाठी महापुरुषांचे अवतार होतात. आजच्या काळात धर्माधिष्ठित राष्ट्र उभारणीसाठी समाज एकत्र येणे आवश्यक आहे.”
सभेची वैशिष्ट्ये
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभेला उपस्थित १० हजारांहून अधिक नागरिक एकत्रितपणे या गीताचे गायन करणार आहेत. तसेच शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन १ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपासून ते २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
सभेच्या निमित्ताने सनातन संस्थेतर्फे राष्ट्र, धर्म, अध्यात्म आणि आयुर्वेद विषयक ग्रंथ व फलकांचे प्रबोधनपर प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.
या सभेत ३० वर्षे देशसेवा केलेले लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा, सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडये, हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बीरेंद्र इचलकरंजीकर आणि प्रशांत जुवेकर हे मार्गदर्शन करणार आहेत.


