धरणगाव (प्रतिनिधी) –
धरणगाव तालुक्यात मंगळवार, दिनांक २७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काही ठिकाणी अचानक अवकाळी पाऊस व जोरदार वादळाने हजेरी लावली. या अवकाळी पावसासोबत आलेल्या वादळामुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील मका, ज्वारी व गहू पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके पूर्णतः आडवी पडल्याने शेतकऱ्यांची मेहनत मातीमोल ठरली आहे.
अनेक शेतांमध्ये वादळाच्या तीव्रतेमुळे पिके जमीनदोस्त झाली असून काढणीच्या तोंडावर आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून पुढील आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ , युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरीयांना दिली. याची तातडीने दखल घेत शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांनी धरणगाव तहसीलदारांना फोन करून त्वरित पंचनामे करून शासनस्तरावर नुकसान भरपाई मिळावी मागणी केली
दरम्यान, महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागात लवकरात लवकर पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.



