भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ पालिकेत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शहरात सातत्याने राजकीय घडामोडी घडत आहेत. मात्र या राजकारणात शहराचा सर्वांगीण विकास कुठेतरी मागे पडत असल्याची भावना आता सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. नागरिकांना राजकीय आरोप-प्रत्यारोपात रस नसून चांगले रस्ते, कार्यरत पथदिवे, स्वच्छता आणि नियमित पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांची अपेक्षा आहे. मात्र सध्याचे एकूण राजकीय चित्र पाहता आगामी काळात परिस्थितीत सुधारणा होईल, अशी चिन्हे दिसत नसल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलकुंभाच्या कामाला लागलेला ब्रेक आणि त्यानंतर पालिका स्थलांतरावरून उठलेला वाद यामुळे वातावरण अधिकच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले हे आजपासून तब्बल महिनाभर रजेवर गेल्याने शहराच्या कारभारावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेंदुर्णी सीओंकडे पदभार
खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी 20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीसाठी एक महिन्याची रजा घेतली आहे. रजेचे अधिकृत कारण जरी स्पष्ट झाले नसले, तरी शहरात सुरू असलेल्या राजकीय संघर्ष व आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ‘नसती डोकेदुखी नको’ या भूमिकेतून त्यांनी रजा घेतल्याची चर्चा आहे.
मुख्याधिकारी महिनाभर अनुपस्थित राहिल्यास नागरिकांची दैनंदिन कामे खोळंबण्याची शक्यता असून शहराच्या विकासकामांनाही ब्रेक लागण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांच्या अनुपस्थितीत शेंदुर्णी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्याकडे भुसावळचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. मात्र धांडे यांना दररोज भुसावळात उपस्थित राहणे शक्य नसल्याने याचा परिणाम प्रशासनाच्या कामकाजावर व विकासप्रक्रियेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सत्ताधारी-विरोधकांच्या वादात विकास नको भरकटू
दरम्यान, भुसावळ पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सत्ताधारी आणि भाजपा विरोधक यांच्यात पालिका स्थलांतराच्या मुद्द्यावरून तीव्र वाद निर्माण झाला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून सुरू झालेला हा वाद जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर सध्या स्थलांतराच्या प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागला आहे.
मात्र सत्ताधारी व विरोधकांमधील कलगीतुऱ्यांमुळे शहराचा विकास थांबू नये, हीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच मुख्याधिकारी रजेवरून परत येणार की थेट बदली करून घेणार, याबाबतही शहरात चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय संघर्ष बाजूला ठेवून शहराच्या विकासावर लक्ष दिले जावे, अशी अपेक्षा आता नागरिकांकडून ठामपणे व्यक्त होत आहे.


