भुसावळ पालिकेला नवे नेतृत्व ; गायत्री भंगाळे यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार :

भुसावळ प्रतिनिधी :
भुसावळ नगरपरिषदेला तब्बल नऊ वर्षांनंतर नवे नेतृत्व लाभले असून, नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांनी आज अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. या प्रसंगी नगरपरिषद कार्यालयात उत्साह व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या ऐतिहासिक घडामोडीमुळे शहराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

पदभार स्वीकारताना माजी आमदार संतोषभाऊ चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नगरसेवक उल्हास पगारे यांच्यासह विद्यमान व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षांचे स्वागत केले व अधिकृत प्रक्रिया पार पाडली.

पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी भुसावळ शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यावर भर दिला. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज तसेच मूलभूत नागरी सुविधा या मुद्द्यांवर प्राधान्याने काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी भुसावळच्या विकासासाठी आक्रमक भूमिका मांडत, प्रलंबित कामांना गती देण्यासाठी ‘ट्वेंटी-ट्वेंटीचा सामना’ खेळणार असल्याची प्रतिक्रिया दिली. कमी वेळेत जास्तीत जास्त कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा भंगाळे यांनी नगरपरिषदेच्या विविध विभागांची कार्यपद्धती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. प्रशासनात पारदर्शकता व गतिमान निर्णयप्रक्रिया राबवण्यावर भर दिला जाईल, असे संकेत त्यांनी दिले. यावेळी त्यांचे सासरे नारायण भंगाळे व पती चेतन भंगाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपमुख्याधिकारी परवेझ अहमद, कार्यालय अधीक्षक वैभव पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नव्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली भुसावळ शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

एकूणच, गायत्री भंगाळे यांच्या नगराध्यक्ष पदग्रहणामुळे भुसावळ नगरपरिषदेत नव्या जोमाने कामकाजाला सुरुवात होणार असून, रखडलेल्या विकासकामांना गती मिळण्याची आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.