मुंबई – राज्यात गेल्या दोन–तीन दिवसांत पुन्हा थंडीची चाहूल लागली असून विशेषत: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात उल्लेखनीय घट नोंदवली जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी (६ डिसेंबर) राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान नागपूरमध्ये ९.६ अंश सेल्सिअस तर गोंदियात १०.४ आणि यवतमाळमध्ये १०.२ अंश नोंदले गेले.

उत्तर भारतात जोरदार थंडी पडत असून, तिकडून येणाऱ्या थंड प्रवाहांचा परिणाम महाराष्ट्रावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. ढगाळ वातावरण कमी झाल्याने हवेत गारठा वाढत आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, जळगाव या भागांतही तापमानात घट जाणवत आहे.
मुंबई २३.४, सांताक्रूझ २२.९, रत्नागिरी २४.२, डहाणू १९.१, पुणे १४.१, लोहगाव १७.१, अहिल्यानगर १२.४, जळगाव १२, कोल्हापूर १९.४, महाबळेश्वर १३.२, मालेगाव ११.४, नाशिक ११.५, सांगली १९.६, सातारा १६.६, सोलापूर १७.४, छत्रपती संभाजीनगर १२.४, परभणी १२.५, बीड १२.८, अकोला १२.८, अमरावती १२.६, बुलढाणा १३.२, ब्रम्हपुरी १२.९, चंद्रपूर १३.२, गोंदिया १०.४, नागपूर ९.६, वाशिम ११.८, वर्धा ११.२, यवतमाळ १०.२.
पुढील ७ ते १२ डिसेंबर दरम्यान राज्यभर हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहणार आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या सुमारास गारठा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दिवसाच्या कमाल तापमानातही घट होत असून, शनिवारी सर्वाधिक कमाल तापमान सांताक्रूझ येथे ३२.५ अंश नोंदवले गेले.
राज्यात हिवाळ्याची लाट आता हळूहळू व्यापक होत असून, नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर वाढवण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.


