भुसावळ(प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या भुसावळ सार्वत्रिक नगरपरिषद निवडणूक 2025 च्या तहसील कार्यालय भुसावळच्या गोडाऊन मध्ये असलेल्या सर्व ईव्हीएम मशीन च्या बॅटरी बॅकअप बॅटरी चार्जिंग क्षमता व तसेच संबंधित संपूर्ण परिसरामध्ये जामर वगैरे बसवण्याची मागणी प्रभाग क्रमांक २४ अ चे उमेदवार मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केलेली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,
नुकतेच महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून व काही तांत्रिक अडचणीवरून विविध प्रभागांच्या पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका न्यायालयीन आदेशांमुळे पुढे ढकलण्यात आल्या असून आता २० डिसेंबर रोजी मतदान, तर २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तसेच भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक चार ब पाच ब आणि अकरा ब या तीन जागांसाठी सुद्धा 20 डिसेंबरला मतदान होणार आहे .या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४अ मधून उमेदवारी करणारे शिशिर दिनकर जावळे यांनी ईव्हीएम सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची मागणी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.

जावळे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की भुसावळ शहरातील तहसील कार्यालयातील गोडाऊनमध्ये सध्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. सदर ईव्हीएम मशीनचे संरक्षण त्यांच्या बॅटरी बॅकअप त्यांच्या बॅटरी चार्जिंग ची व्यवस्था त्या बॅटऱ्यांची चार्जिंग क्षमता वगैरे सर्व बाबी संबंधित प्रशासनाने उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येकास माहिती पुरवणे अपेक्षित आहे.
ते पुढे म्हणाले—
“ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या भुसावळ तहसील कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. तसेच स्ट्रॉंग रूम परिसरात मोबाईल नेटवर्क, वाय-फाय, ब्लूटूथ यांसारख्या अनधिकृत इलेक्ट्रॉनिक सिग्नल्सना रोखण्यासाठी उच्च क्षमतेचे जॅमर बसवणे अत्यावश्यक आहे.”
जावळे यांनी आयोगाला दिलेल्या पत्रात पुढे लिहिले—
“ईव्हीएमची सुरक्षितता ही निवडणुकीच्या पवित्रतेचा कणा आहे. तांत्रिक हस्तक्षेप वा अनधिकृत प्रवेश यांची किंचितही शक्यता राहू नये. भुसावळ तहसील कार्यालयात साठवलेल्या सर्व ईव्हीएम यंत्रणेसाठी तातडीने अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था करण्यात याव्यात.”
त्यांनी निवडणूक आयोगास त्वरित आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.


