भुसावळ (प्रतिनिधी)-
कोरोना या संसर्ग आजाराने यावर्षी कहर केला आहे.यामुळे शेतकरी,व्यापारी , मजूर सर्वच अडचणीत आले आहेत . शेतकऱ्यांची स्थिती तर अतिशय बिकट झाली आहे.शेतकऱ्यांना बी -बियाणे व रासायनिक खते मोफत देण्यात यावे अशी मागणी भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा – वराडसिम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी तहसीलदार भुसावळ मार्फत मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,अगोदरच शेतकरीवर्ग कर्जबाजारी झाला होता. त्यांना दिलासा मिळावा , यासाठी शिवसेनेने विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाला अनुसरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वेळेस कर्जमाफीची घोषणा केली. पहिल्या टप्प्यातील लोकांना दिलासा मिळाला.तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्यांना व नियमित कर्जफेड करणाऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली .सदर प्रक्रिया सुरू असतांना देशात व राज्यात कोरोनाने कहर केला. त्यामुळे कर्जमाफीची योजना राबविण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी नवीन कर्जाच्या प्रतीक्षेत आहे. तर कोरोना मुळे गेल्या दीड-दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे व मजुरांचे काम बंद पडले आहे.कापूस खरेदी विक्रीची प्रक्रिया सुरू असतानाच कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करून सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच कापूस खरेदी केंद्रांवरील कापूस खरेदी थांबवली आहे. या परिस्थितीत कोरोणा लागण वाढत असल्यामुळे कापूस खरेदी अद्यापही बंद आहे .४० टक्के शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही कापूस पडून आहे.कोरोनामुळे मजुरी नाही ,कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही,त्यामुळे नवीन कर्ज नाही,तर मजुरी नाही,अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची गरज आहे.
पेरणी दीड महिना राहिली आहे.अद्यापही शेती तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दीड महिन्यात शेती तयार करून पेरणीसाठी बी-बियाणे व खते उपलब्ध करणे गरजेचे आहे . अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा , यासाठी मोफत बी – बियाणे व खते देण्यात यावे अशी मागणी केली आहे.



