विजेचा शॉक लागून सावदा पालिकेचे दोन रोजंदारी कर्मचारी जखमी:

सावदा – . | सावदा नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या मांगलवाडी परिसरातील तापी नदी पात्राला लागून असलेल्या जॅकवेलवर शुक्रवार दिनाक २६ जुलै रोजी देखभाल आणि दुरुस्ती कामा दरम्यान गंभीर दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन रोजंदारी करणाऱ्या मजुरांना विद्युत शॉक बसून ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेने रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नेहमीप्रमाणे देखभाल व दुरुस्तीचे जॅकवेलवर काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्यामुळे पृथ्वी भंगाळे आणि पंकज बेंडाळे या दोन रोजंदारी कर्मचाऱ्यांना विजेचा शॉक लागला. शॉक इतका तीव्र होता की दोघे जागेवरच बेशुद्ध पडले. लागलीच उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने सावदा येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

या घटनेची माहिती मिळताच लागलीच नगरपालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, जॅकवेलमध्ये काम सुरू असताना विजेचा पुरवठा पूर्णपणे बंद न करता काम सुरू ठेवण्यात आलं होतं. तसेच सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणांचीही कमतरता होती, ही गंभीर निष्काळजीपणाची बाब समोर आली आहे” या संस्थेमार्फत ठेकेदारी पद्धतीने करण्यात आल्याचे सांगितले जात आहे

या संदर्भात असे सांगितले गेले की, आस्था संस्थे कडून रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा पाचशे रुपयांची कपात केली जाते. ही कपात का केली जाते? या बाबत कोणतीही स्पष्टता नाही. मात्र तरीही त्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा किंवा अपघात विमा वैगरे दिला जात नाही, अशी कामगारांची तक्रार आहे. यापूर्वीही असा अपघाताचा प्रकार घडला होता. त्या वेळी ही ठेकेदाराने कोणतीही जबाबदारी घेतली नव्हती. ही अपघाताची घटना ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरत आहे.

पालिका प्रशासनाने जखमी मजुरांच्या उपचारासाठी लागणारी वैद्यकीय खर्चाची जबाबदारीही स्वीकारली असली तरी मात्र संपूर्ण यंत्रणेतील निष्काळजीपणा, ठेकेदाराच्या जबाबदारीची मर्यादा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे पालन या मुद्द्यांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.