हज 2025 साठी महाराष्ट्रातील 29 पोलिस कर्मचाऱ्यांची निवड; जळगाव जिल्ह्यातून तौसिफ सईद शेख यांची राज्य हजनिरीक्षक म्हणून नियुक्ती –


भुसावळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य हज समितीने हज यात्रेच्या नियोजनासाठी 2025 सालासाठी राज्यभरातून एकूण 29 पोलिस कर्मचाऱ्यांची निवड राज्य हज निरीक्षक म्हणून केली आहे. या कर्मचाऱ्यांना 45 दिवसांसाठी सऊदी अरेबियात प्रतिनियुक्त करण्यात येणार असून, ही नियुक्ती केंद्रिय हज समिती, मुंबई यांच्या परिपत्रकानुसार करण्यात आली आहे.

हज 2025 साठी महाराष्ट्रातून निवड झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातून केवळ एकच पोलीस कर्मचारी, पोलिस कॉन्स्टेबल तौसिफ सईद शेख (व.क्र. 1614) यांची निवड झाली आहे. ते भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असून, त्यांची ही निवड संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची बाब मानली जात आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य हज समितीने दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी पत्राद्वारे पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना सूचना दिल्या असून, यानुसार सर्व निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियोजित उड्डाणाच्या तारखेच्या किमान तीन दिवस आधी कार्यमुक्त करण्याचे आदेश संबंधित पोलिस विभागांना देण्यात आले आहेत.

तौसिफ सईद शेख यांना दिनांक 16 मे 2025 रोजी सऊदी अरेबियासाठी विमानाने प्रस्थान करावयाचे असून, त्यासाठी त्यांना दिनांक 13 मे 2025 रोजी कार्यमुक्त करण्यात येणार आहे. कार्यमुक्तीनंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य हज समितीचे कार्यालय, रूम नं. 6, 7, 8, साबू सिद्दीकी मुसाफिरखाना, एल.टी. मार्ग, मुंबई 400001 येथे हजर राहणे आवश्यक आहे.

या 45 दिवसांच्या प्रतिनियुक्ती कालावधीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन कर्तव्यकाळ म्हणून गणले जाईल आणि त्यांचे वेतन त्यांच्या मूळ विभागामार्फतच नियमितपणे देण्यात येईल. प्रवास व वास्तव्याचा सर्व खर्च राज्य शासनाच्या मंजूरीनुसार महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत भागवण्यात येणार आहे. मात्र, या कालावधीत इतर कोणतेही भत्ते किंवा वेतन मिळणार नाही.

हज समितीने यंत्रणांना स्पष्टपणे सूचित केले आहे की, यापुढे कोणताही विलंब टाळून कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यमुक्त केले जावे. कारण याआधी अनेकवेळा अशा प्रकारच्या प्रतिनियुक्त्यांमध्ये उशीर झाल्यामुळे पर्यायी कर्मचारी पाठवता आले नाहीत आणि नियोजित कार्यक्रमांवर परिणाम झाला आहे.

जळगाव जिल्ह्याच्या पोलीस दलातर्फे तौसिफ सईद शेख यांची ही निवड ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून, धार्मिक सेवेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याची ही संधी त्यांना मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.