भुसावळ,( प्रतिनिधी) भुसावळ येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा दि. सहा मे रोजी पंचायत समिती सभागृह भुसावळ या ठिकाणी पार पडली.
यावेळी साकरी ता. भुसावळ येथील मातृभूमी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष किरण चोपडे यांनी शेतकऱ्यांना संघटित होऊन आपल्या शेतमालाचे ट्रेडिंग, ग्रेडिंग व आकर्षक पॅकिंग आणि मार्केटिंग करून चांगले उद्योजक व्हावे असे आवाहन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती हर्षदा देसले, भुसावळ पं. स.गटविकास अधिकारी सचिन पानझडे हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी केले. प्रमुख वक्ते डॉ. धीरज नेहेते यांनी शेतमालाचे उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढीची माहिती सांगितली. समाधान पाटील यांनी कृषी मालाचे प्रक्रिया उद्योग व त्यासाठी मिळणारे अनुदान याविषयी मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेती पुरस्कारार्थी शेतकरी नारायणराव पाचपांडे यांनी विमुक्त अन्नधान्य पिकवून जागतिक बाजारपेठेत असलेली मागणी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मंडळ कृषी अधिकारी श्री ऋषिकेश चौधरी यांनी विनापरवाना बियाणे खरेदी न करता खात्रीशीर दुकानदाराकडून खरेदी करावे असे आवाहन केले. प्रवीण बावस्कर कृषी पर्यवेक्षक यांनी ॲग्रीस्टॅक योजनेची माहिती सांगून त्यांची उपयुक्तता स्पष्ट केली. मनोज शिंदे यांनी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. पाणी फाउंडेशन डिजिटल शेती शाळा व्हिडिओ क्लिप चे ऑनलाइन प्रक्षेपण सुमित भरगडे यांनी केले. कार्यक्रमाचे मध्यांनानंतर नितीन प्रजापती, राहुल जगताप ,विलास बारी यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी दशपर्णी जीवामृत व निंबोळी अर्क आणि माती परीक्षणाचे फायदे सांगितले व त्याचे लाईव्ह प्रात्यक्षिक दाखविले. कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन आत्माचे तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांनी केले. यावेळी भुसावळ तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी व महिला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कृषी विभाग व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



