आधुनिक भारतातील शैक्षणिक क्रांतीच्या अग्रदूत सावित्रिमाई ज्योतिबा फुले -डॉ. दिनेश पाटील

भालोद- भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यपिका, आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीच्या पहिल्या महिला अग्रदूत, स्त्री मुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या, क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांनी अखंड मानव मुक्ती साठी अविरत कार्य केले, म्हणूनच भारतातील महिलांच्या इतिहासामध्ये त्यांचे स्थान अढळ आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हे ओळखून ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी १७७ वर्षापूर्वी म्हणजे १ जानेवारी १८४८ ला पुणे येथे भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु करून शिक्षणाच्या क्रांतीची मशाल पेटवली. त्यांनी केलेले हे कार्य म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात समाज प्रबोधानाचे प्रखर पर्व निर्माण केले. सर्व मनुष्यासाठी शिक्षण हा मुलभूत विचार त्यांनी निर्भीडपणाने मांडला. त्यासाठी त्यांना समाजाकडून अपमान, छळ, सोसावा लागला तरी शुद्धा याला न डगमगता या दाम्पत्याने अभूतपूर्व कार्य अविरत चालू ठेवले. त्यांनी मानवतावाद, सामाजिक व धार्मिक दाष्यातून मुक्तता, व्यक्ती स्वातंत्र, विज्ञानवाद, लोकशाहीची मूल्य लोकांच्या मनात रूजवून समाज प्रबोधनाचे युग निर्माण केले म्हणूनच त्यांना आधुनिक काळातील समग्र क्रांतीचे अग्रदूत म्हटले जाते. सावित्रीमाईच्या तत्वज्ञानावर आज बऱ्याच मोठ्या प्रमाणावर संशोधन कार्य सुरु आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेण्याचे सामर्थ्य विध्यार्थानमध्ये असायला पाहिजे. कारण जिद्ध चिकाटी योजनाबद्ध कार्याचे दुसरे नाव म्हणजे फुले दाम्पत्य होय. क्रांतीज्योती सावित्रिमाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला आदर्श मानून विध्यार्थांनी अभ्यास केला तर कोणतीही परीक्षा सहज पास करता येते , असे प्रतिपादन कला व विज्ञान महाविध्यालय भालोद येथील प्राध्यापक डॉ. दिनेश पाटील यांनी केले.

ते कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील नॉलेज रिसोर्स सेंटर तर्फे सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

ते पुढे असेही म्हणाले कि, रूढी परंपरा आणि अज्ञान यांचे उच्चाटन करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी ऐन तारुण्यात आपल्या जीवनाचे समर्पण केले. म्हणूनच फुले दांपत्याचे आपल्या देशावर अनंत उपकार आहेत. एकोणीसाव्या शतकातल्या अशिक्षित, अज्ञानी, पिडीत अश्या समाजाला त्यांनी ज्ञानदीप दाखऊन चिरंतर आठवण राहील असे मार्गदर्शन केले. आजचा सुशिक्षित व ज्ञानसंपन्न महाराष्ट्र म्हणजे सावित्रिआई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सेवेची फलश्रुती होय. सावित्रीमाईच्या कार्याचे आकलन समाजाला जसजसे होत जाईल तसतसा समाज सुविध्य होत जाईल त्यांनी केलेले कार्य भारतातील स्त्रिया जेव्हा समजून घेतील तेव्हाच महिला सबलीकरण होईल आणि रूढी परंपरेच्या जाचातून महिलांना मुक्ति मिळेल. कारण जेव्हा माणूस स्वयं निर्णय घ्यायला लागतो तेव्हाच मुक्ती मिळाली असे म्हणता येयील.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर जी. कोल्हे हे होते.

सावित्रीबाई फुले यांनी आधी स्वत: आपले पति महात्मा जोतिबा फुले यांच्याकडून स्वत: शिक्षण घेतले. असंख्य अडचणीवर मात करत स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविली व स्त्री शिक्षणाची द्वारे पुढील अनेक पिढ्याकरीता खुली केली. त्यामुळे आज आपणास विविध क्षेत्रात मोठ्या संख्येने उच्च शिक्षित महिला वेगवेगळ्या पदांवर कार्य करतांना दिसत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी भारतातील महिलांच्या सामाजिक स्थितीत सुधारणा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असे मत अध्यक्षीय मनोगत वेक्त करतांना प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. दिगंबर खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. जतीनकुमार मेढे यांनी केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी, डॉ. अजयकुमार कोल्हे, डॉ जतीनकुमार मेढे, डॉ. के. जी. चौधरी, डॉ. वसंत पवार, डॉ. जी आर. चौधरी, प्रा. सी.व्ही. वानखेडे, डॉ. मीनाक्षी वाघुळदे, प्रा. आर. बी. इंगळे, प्रा. एच. टी. इंगळे, प्रा.राकेश चौधरी, प्रा. भावना प्रजापती, व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज नेहेते, मुबारक तडवी, तुळशीराम पाटील, यांचे सहकार्य लाभले.