शिंदी, ता. भुसावळ( वार्ताहर)— महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीकरता दिनांक 27 जुलै 2024 शनिवारी दुपारी दोन वाजता शामाप्रसाद मुखर्जी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव पर्यंत पेन्शन छत्री मोर्चाचे आयोजन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा जिल्हा जळगाव द्वारा करण्यात आले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश एस नेमाडे यांनी नमूद केले आहे की, दोन कर्मचाऱ्यांना भिन्न निवृत्तीवेतन देणे हे अन्यायकारक आहे .एक नोव्हेंबर 2005 नंतर नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने नवीन पेन्शन योजना लागू केली. मात्र जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, सर्व अधिकारी या सर्वांना नवी योजना रद्द करून जुनीच निवृत्तीवेतन वेतन योजना लागू करावी यासोबतच केंद्राप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, वेतन त्रुटी भरून द्याव्यात अशी सुद्धा संघटनेची मागणी आहे. 31 ऑक्टोबर 2005 रोजी चा काळा शासन निर्णय रद्द करावा ही प्रमुख मागणी आहे. एक नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनावरील त्यांचा न्याय हक्क प्राप्त होईपर्यंत सर्व प्रकारच्या आंदोलनांमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सक्रिय सहभागी राहील. एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य आर्थिक संकटांचा सामना करत घालवावे लागेल. नवीन पेन्शन योजनेनुसार त्यांना दैनंदिन खर्च सुद्धा भागवता येणार नाही. आयुष्यातील जवळपास 30 वर्षे जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा हलाखीत काढावयास लागू नये म्हणून राज्य शासनाने त्वरित एक नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या सर्व कर्मचारी, अधिकारी वर्गास नवीन पेन्शन योजना रद्द करून सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी. एकाच प्रकारचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना भिन्न निवृत्ती वेतन योजना देणे हे अन्यायकारक असून याबाबत देशातील काही राज्यांनी पुढाकार घेतला आहे व जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा शाखा जळगाव द्वारा जळगाव येथे दिनांक 27 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन छत्री मोर्चात सर्व सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश एस नेमाडे, राज्य प्रतिनिधी एस. एस. अहिरे, उपाध्यक्ष दिनेश पाटील (जामनेर), जिल्हा कार्यवाह अश्विन कुमार इंगळे, जिल्हा प्रतिनिधी जी. व्ही .पाटील (बोदवड) यांनी केले आहे.



