भुसावळ – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक म्हणजे राजकीय इतिहासाला वळण देणारी एक मोठी ऐतिहासिक बाब आहे. एक प्रकारे नवीन सृष्टीची निर्मिती करून सार्वभौमत्व प्राप्त करून देणारी शिवराज्याभिषेक ही घटनाच विलक्षण आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक हा आपल्या भारतीय अस्मितेचा आविष्कार असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. केदारनाथ फाळके यांनी येथे केले.

भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयातील वाचन कक्षात सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित वाचन संस्कार व्याख्यानमालेेचे द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत उर्फ मुन्ना ठाकूर, जय गुरूदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते, रामदास निकम, वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन तोडकर उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती मातेच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकातून डॉ. जगदीश पाटील यांनी व्याख्यानमाला आयोजनाची भूमिका सांगून वाचन संस्कार रूजवण्यासाठी असे उपक्रम लाभदायी ठरतात असे सांगितले. ज्येष्ठ वाचक पल्लवी जाधव, अनिल गोष्टी, संध्या भोळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते डॉ. केदारनाथ फाळके यांचा परिचय प्रवीण नायसे यांनी करून दिला. अध्यक्षीय मनोगतात महेश फालक यांनी वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारच्या उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. श्रीशिवराज्याभिषेक : नव्या युगाचा प्रारंभ या विषयावर इतिहास संशोधक डॉ. केदारनाथ फाळके यांनी पीपीटीच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक करून आपल्या मस्तकावर छत्र धारण केले आणि छत्रपती विराजमान झाले. तसेच स्वतःची नाणी निर्माण करून त्यावर शिवमुद्रा कोरली. एवढेच नाही तर राज्याभिषेक शक सुरू केले. त्याचप्रमाणे भाषाशुद्धीसाठी राज्यव्यवहार कोशाची देखील निर्मिती केली. त्यामुळे शिवराज्याभिषेक ही घटना आपल्या भारतीय इतिहासासाठी एक अत्यंत आनंददायी व अभिमानास्पद आहे. मुघल सत्तेला आव्हान देऊन आपले स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक हा एक हिंदू अस्मितेचा आविष्कार असल्याचेही त्यांनी सांगितले. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी कवी भूषण यांच्या शेर शिवराज आहे या श्लोकाच्या ओळी म्हटल्या. महाविद्यालयातील तरूणांसह वाचक व नागरिकांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. सूत्रसंचालन शिशिर जावळे यांनी तर आभार सोनू चिप्पड यांनी मानले. यशस्वीतेसाठी ग्रंथपाल नितीन तोडकर, सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे, सेवक होनाजी चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
चौकट
वाचनालयाच्या वर्धापनदिनी आज ग्रंथदिंडी व व्याख्यान
भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयाच्या 154व्या वर्धापनदिनी आज शनिवार, दि. 20 रोजी सकाळी सात वाजता ग्रंथपूजन करून सार्वजनिक वाचनालय ते के. नारखेडे विद्यालयापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर तेथे हास्य कलाकार प्रभाकर निलेगावकर यांचे समारोपीय व्याख्यान अस्सल माणसे इरसाल नमुने या विषयावर होईल. उपस्थितीचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत उर्फ मुन्नाभाऊ ठाकूर व ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी केले आहे.


