कामगारांसाठी भुसावळ मध्ये ईएसआयएस दवाखाना उभारण्यासाठी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांना शिशिर जावळे यांची मागणी :

भुसावळ
भारतातील उद्योगांची भरभराट सुनिश्चित करण्यासाठी आणि कामगारांना आरोग्य आणि आर्थिक बाबतीत संरक्षण मिळावे यासाठी संसदेने कर्मचारी राज्य विमा कायदा, 1948 लागू केला. कर्मचारी राज्य विमा योजना (ESIS Disp) हा भारतातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य विमा कार्यक्रम आहे जो कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना आजारपण, दुखापत किंवा अपंगत्व तसेच इतर आरोग्य सेवा सुविधांच्या बाबतीत आर्थिक सहाय्य आणि वैद्यकीय सेवा प्रदान करतो. योजना सर्व कारखाने आणि इतर आस्थापनांसाठी लागू आहे. ज्यात ई एसआय कायद्यामध्ये दहा किंवा त्यापेक्षा जास्त संख्या असलेले, विविध कारखाने, तसेच कंत्राटी पद्धतीने ठेकेदारांकडे काम करणारे कर्मचारी, , रेस्टॉरंट, वृत्तपत्र आस्थापने ,सिनेमागृह, थिएटर हॉटेल्स रोड मोटर वाहतूक उपक्रम आणि दुकानां मॉल मध्ये काम करणारे सर्व कामगार या योजनेंतर्गत पात्र आहेत. या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात अमळनेर, जळगाव शहर, चाळीसगाव आणि जळगाव एमआयडीसी येथे या योजनेअंतर्गत कामगारांसाठी रुग्णालये आहेत. मात्र भुसावळ तालुक्यात कर्मचारी राज्य विमा योजनेचे इएसआयएस रुग्णालय नसल्याने भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र,ऑर्डर्स फॅक्टरीज, रेल्वे , नगरपालिका सह इतर शासकीय कार्यालय , खाजगी कारखाने व इतर आस्थापनांवरती कार्यरत असणारे कर्मचारी तथा कंत्राटी पद्धतीने ठेकेदारांकडे काम करणारे तसेच भुसावळ एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये कार्यरत हजारों कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यासाठी वैद्यकीय सेवा घेण्यासाठी जळगाव येथे स्थित ईएसआयएस रुग्णालयात जाण्यासाठी बराच वेळ लागतो यामुळे वेळेअभावी व उपचाराअभावी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे भुसावळ तालुक्यासाठी कर्मचारी राज्य बीमा योजनेचे ESIS रूग्णालय लवकरात लवकर मंजूर करून भुसावळ शहरात उभारण्यात यावे. यासाठीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी कामगार कल्याण हितासाठी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीया यांना पाठविले असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलेले आहे.