ऐनपूर, ता. रावेर – ज्ञान आणि संस्काराशिवाय जीवन शून्य आहे. संस्कार व ज्ञानच मनुष्याला श्रेष्ठ बनवते. कोणत्याही व्यक्तीची प्रगती ही त्याच्यावर झालेल्या संस्कारावर आणि त्यांनी मिळविलेल्या ज्ञानावर अवलंबून असते. समाजहित तसेच देशहित सांभाळण्यासाठी संस्काराची शिदोरी प्रत्येकाने जोपासली पाहिजे त्यामुळे शालेय जीवनात मिळालेली ही संस्कार शिदोरी आयुष्यभर पुरणारी असून ती सोबत ठेवण्याचे आवाहन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी येथे केले.
रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था संचालक तथा बलवाडी शाळेचे मुख्याध्यापक एन. व्ही. पाटील तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य आर. जे. पाटील, उपमुख्याध्यापक एस. डी. चौधरी, पर्यवेक्षक पी.आर. महाजन, प्रा. जी.यू. कंखरे, प्रा. जे.डी. महंत, स्थानिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जी.आर. महाजन, वरिष्ठ शिक्षक डी.बी. चौधरी यांची होती. प्रारंभी डॉ. जगदीश पाटील यांच्या सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दहावीच्या मैत्रेयी प्रफुल्ल जोशी, मोहित सुधीर महाजन, यश मनोहर कोळी, अर्पित सुशील चौधरी तर बारावीच्या तेजस्विनी राजेंद्र चौधरी, भूमिका सुनील भिरूड, वैष्णवी पांडुरंग पाटी, प्रेम गोपाल महाजन, सैय्यद आवेश सय्यद कलीम या विद्यार्थ्यांनी निरोपाची मनोगत व्यक्त करून अनुभव कथन केले. डॉ. जगदीश पाटील यांचा परिचय वाय.आर. महाजन यांनी करून दिला. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, मनुष्य प्राणी सर्वश्रेष्ठ बुद्धिमान व अनेक विचारांचा निर्माता आहे. ज्ञानाच्या कौशल्याने विविध क्षेत्रात तो प्रगती करू शकतो. शिक्षणाचे उद्दिष्ट हे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे असा असून त्यासाठी उपजत व संपादित क्षमता व कौशल्ये प्राप्त करण्याची गरज आहे. आनंदी व सुंदर जीवन जगण्यासाठी अध्ययन कौशल्ये, साक्षरता कौशल्ये व जीवन कौशल्ये आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतात एन.व्ही. पाटील यांनी भविष्यकालीन शिक्षणविषयक माहितीचा वेध घेवून विद्यार्थ्यांनी त्यासाठी आवश्यक ती तयारी करावी व पाठ्यपुस्तकासोबतच दैनंदिन व्यवहारात निपुण होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन वाय.आर महाजन यांनी तर आभार आर.बी. पाटील यांनी मानले. निरोप समारंभ कार्यक्रमाला दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. यशस्वीतेसाठी निरोप समारंभ समितीने परिश्रम घेतले.



