भुसावळ- येथील अंतर्नाद प्रतिष्ठानने वाड्या वस्त्यात दीपोत्सवात फराळ, नवीन कपडे आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.दात्यांकडून वाटी वाटी फराळ, सुस्थितीतील जुने कपडे, नविन कपडे आणि शालेय साहित्य गोळा करायचे. गरजू वस्त्या शोधायच्या आणि त्याठिकाणी दिवाळी साजरी करायची असा हा उपक्रम आहे.यंदा उपक्रमाचे सातवे वर्ष आहे.

समाजाचे आपण काही देण लागतो या भावनेतून अंतर्नाद प्रतिष्ठानने सन २०१६ मध्ये या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.पहिल्या वर्षी चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी, दुसऱ्या वर्षी जोगलखोरी व रावेर तालुक्यातील जुनी मोहमांडली येथे, तिसऱ्या वर्षी सातपुड्यातील काळाडोह, मोर धरण, विटवा या वस्तीवर तर चवथ्या वर्षी वड्री धरणाजवळील आसराबारी, पाचव्या वर्षी जामुन झिरा तर गेल्या वर्षी डोंगरदे या आदिवासी वस्तीवर हा उपक्रम राबविण्यात आला.यंदा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यातील आदिवासी पाड्यावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शहरवासीयान कडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता यंदा व्यापक स्वरूप देण्याचा मानस प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकानी व्यक्त केला आहे.ज्यांना शक्य नसेल पण देण्याच सुख अनुभवायच असेल त्यांनी नविन कपडे, जुने कपडे स्वच्छ धुवुन व इस्त्री करुन द्यावे.फराळ द्यायचा असेल तर उपक्रम समितीशी संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख प्रदिप सोनवणे,समन्वयक अमित चौधरी, सह समन्वयक विक्रांत चौधरी, भूषण झोपे यांनी केले आहे.
उपक्रमासाठी ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, संजय भटकर, जीवन महाजन, अमितकुमार पाटील, प्रसन्ना बोरोले, समाधान जाधव, राजेंद्र जावळे, शैलेंद्र महाजन, राजू वारके, कुंदन वायकोळे, देव सरकटे, श्याम दुसाने, निवृत्ती पाटील, जीवन सपकाळे, हरीश भट, प्रमोद पाटील, सचिन पाटील, संदीप रायभोळे , तेजेंद्र महाजन, राहुल भारंबे, मंगेश भावे, संदीप सपकाळे अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील परिश्रम घेत आहेत.
नवे जुने कपडे गोळा करणार
गेल्या वर्षी या उपक्रमात फराळासह जुने व नवे कपडे गोळा करण्यात आले होते,ते जवळपास ४५० व्यक्तीना वाटप करण्यात आले होते.सोबतच नविन चपला, शालेय साहित्य, साखर, तांदूळ, फराळ सुद्धा वाटला होता.यंदा उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे.ज्यांच्याकडे जुने पण चांगल्या स्थितीतील शालेय दप्तर, स्वेटर , ब्लॅकेट असतील ते देण्यासाठी प्रतिष्ठानच्या उपक्रम समितीकडे द्यावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख प्रदिप सोनवणे यांनी केले आहे.


