शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहाेचविणे गरजेचे- समाधान महाजन :


भुसावळ – केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनांचा लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोहाेचविणे गरजेचे आहे. भुसावळ परिसरातील कुठलाही लाभार्थी वंचीत राहू नये याची काळजी शिवसैनिकांनी घ्यावी, नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केले. श्रीनगर येथे शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील व प्रा. सीमा पाटील यांनी आयोजित केलेल्या शासकीय योजनांच्या समाधान शिबिरात ते बोलत होते.
शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, शहरप्रमुख निलेश महाजन, संतोष माळी, गोकुळ बाविस्कर, ललित मुथा व मान्यवरांनी केले. या शिबिरात रेशनकार्डसंबंधित तसेच महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ४५५ नागरिकांनी शिबिरात कागदपत्रे जमा केले.
तहसीलदारांना भेटणार: प्रा.धीरज पाटील
शासन आज नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध योजना तयार करीत आहे. या योजना मूळ लाभार्थींपर्यंत पोहोचत नसल्यामुळे आणि काही वेळा होत असलेल्या शासकीय दिरंगाईमुळे या योजनांचा लाभ नागरिकांना मिळत नाही. रेशनकार्ड संबंधित सर्व अर्ज लवकरच भुसावळ तहसीलदारांना सादर करणार आहे, असे आयोजक प्रा.धीरज पाटील यांनी सांगितले.
अमोल पाटील, सचिन कोळी, गोकुळ भोई, विशाल सपकाळे, शुभम सोनार, गौरव पाटील, राजेश पाटील, पंकज इंगळे, संतोष कोळी यांनी नागरिकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत केली. सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले तर आभार महेश कोळी यांनी मानले.